शेतातील विहिरीत आढळला वाघाचा मृतदेह

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
मुरदोली येथील शेत शिवारातील घटना : वनविभागाची धाव

गोंदिया, 
Tiger's carcass found in well एनएनटीआर च्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील एका शेतातील विहिरीत पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वनविभागाने तपास सुरू केला आहे. मुरदोली येथील शेतकरी रोशनलाल कटरे हे आपल्या शेतातील (सर्व्हे क्र. १८१) पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विहिरीत पाहिले असता, पाण्यात एका वाघाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली.
 
 
tiger
 
माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रितमसिंह कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करून मृत वाघाला विहिरीतून बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो चुकून विहिरीत पडला की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. दरम्यान, या घटनेमुळे मुरदोली व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उघड्या विहिरींवर संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र रात्र असल्यामुळे नॅशनल टायगर कन्सर्वेशन ऑथॉरिटीच्या निर्णयानुसार मृत वाघाला उद्या सकाळी विहिरीतून बाहेर काढून नियमानुसार पंचनामा, शवविच्छेदन व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
प्रीतमसिंह कोडावे, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया