पुरवठ्यासाठी कृषी विभाग सज्ज
बुलढाणा,
Urea fertilizer खरीप हंगामाला वेग आल्याने शेतकर्यांकडून युरिया खताची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकर्यांची मागणी पाहता, सद्यस्थितीत जिल्ह्यात २१ हजार मेट्रीक टन युरीया खत उपलब्ध असून संभाव्य टंचाई टाळण्यासाठी कृषी विभागाने टप्प्याटप्प्याने खताचा पुरवठा सुरू ठेवला असून साठ्याचे नियमित नियोजन केले जात आहे.
सुरूवातीला मंदगतीने सुरू झालेल्या पावसाने १ जुलैनंतर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आणि मका या प्रमुख पिकांची पेरणी केली. पावसामुळे पीके उगवून आल्याने शेतकरी युरिया खताची खरेदी करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ७.७० लाख हेटर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होते. या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने नत्रयुक्त खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. राज्य शासनाने खरीप २०२६ हंगामासाठी महाराष्ट्रात १.५० लाख मेट्रिक टन युरियाचा बफर साठा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार टप्प्याटप्प्याने खताचा पुरवठा केला जात असून शेतकर्यांनी घाबरून अतिरिक्त खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. युरियाची कमाल किंमत २४२ रूपये (नीम कोटिंग व लागू कर वगळून) इतकी आहे. माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणार्या अथवा जादा दराने खत विकणार्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यानंतर युरीया खताची मागणी वाढणार आहे.