१६ जुलैपर्यंत नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकू
हिंगणघाट,
Vacant teacher positions तालुक्यातील पवनी येथील उच्च प्राथमिक शाळेत भाषा व गणित विषयाच्या शिक्षकांची पदं दीर्घकाळापासून रिक्त असल्याने विद्याथ्र्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याबाबत पालकांनी प्रशासनाला अनेकदा निवेदनं दिली. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने १६ जुलैपर्यंत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पहिली ते पाचवीमध्ये ५४ तर सहावी व सातवीमध्ये २८ विद्यार्थी आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेली भाषा व गणित विषयाची दोन शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यापूर्वी गटशिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे. १६ जुलैपर्यंत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास सर्व पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष बाळू महाजन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश बेलवडे, पालक सचिन डफ तसेच महादेव गंगे उपस्थित होते.