वडाळा पशुवैद्यकीय दवाखाना तीन महिन्यांपासून कुलूपबंद

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
पशुपालकांमध्ये संताप; आवारात निरुपयोगी औषध साहित्य अस्ताव्यस्त
 
तळेगाव (श्या.पं़), 
Wadala Veterinary Dispensary Locked Up तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील आणि हुतात्मा भूमी म्हणून ओळख असलेल्या वडाळा येथील पशुवैद्यकीय दवाखाना तीन महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दवाखान्याच्या आवारात निरुपयोगी औषध साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याने दुर्गंधी पसरून स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळा व परिसरात पशुपालन हा अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे.
 
 
wadala
 
आदिवासी, भोई, कुणबी तसेच इतर समाजातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात जनावरे पाळतात. अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भावना पशुपालकांनी व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी दवाखान्याची रंगरंगोटी करण्यात आली. तसेच आधुनिक सुविधा बसविण्यात आल्या. मात्र, इमारत सुशोभित झाल्यानंतरही नियमित पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याची ओरड गावकर्यांची आहे.
 
माजी उपसरपंच तसेच काही ग्रामस्थांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. शेतकरी रवींद्र वडासकर यांनी सांगितले की, दवाखान्यात नियमित सेवा मिळावी, यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून पशुवैद्यकीय अधिकारी नियमित हजर राहतील याची व्यवस्था करावी, दवाखान्याची स्वच्छता करावी आणि पशुपालकांना अखंडित सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.