व्हिएतनाममध्ये जलदुर्घटनेचा कहर

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
फु क्वोक (व्हिएतनाम),
vietnam व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका स्पीडबोटीला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने या घटनेची अधिकृत माहिती देत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे. स्थानिक प्रशासनाकडून अपघाताचा नेमका तपशील गोळा करण्यात येत असून, भारतीय नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले आहेत.
 
vietnam
 
या बोटीत एकूण ३६ जण प्रवास करत होते. त्यामध्ये ३२ पर्यटक आणि चार कर्मचारी यांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर २१ जणांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले आहे.
 
ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. ओशन पियर आयलंड कंपनीची स्पीडबोट पर्यटकांना घेऊन हो चि मिन्ह मार्गावरून आन थोई बंदराच्या दिशेने जात असताना आन न्गोई परिसरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर अचानक उलटली. बोट उलटताच त्यातील सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले.
 
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील इतर पर्यटक बोटी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यात सहभागी झालेल्या एका बोटीच्या मालकाने सांगितले की, त्यांची बोट अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. मात्र अनेक प्रवासी उलटलेल्या बोटीच्या आत अडकले असल्यामुळे त्यांना बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे काही प्रवाशांनाच शुद्धीवर बाहेर काढता आले. दुर्घटनेच्या वेळी समुद्रात उंच लाटा उसळत होत्या. मात्र पाऊस नसल्याने परिसरातील इतर बोटींची वाहतूक सुरू होती.
 
दरम्यान, भारतीय दूतावासाने हो चि मिन्ह शहरातील भारतीय वाणिज्य दूतावास आणि हनोई येथील दूतावासात नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. मदत किंवा माहितीसाठी नागरिकांनी +84 36 281 7930, +84 91 552 37 14, +84 33 452 0414 तसेच हनोई येथील +84 91 308 9165 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन दूतावासाने केले आहे. तसेच या दुर्घटनेबाबत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी भारतीय दूतावास पूर्णपणे सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.