केश्म बेटासह अब्बास बंदरात मोठे स्फोट
वॉशिंग्टन,
attack launched on iran again मागील काही दिवसांपासून सुरू असलेला अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता कमालीचा पेटला आहे. अमेरिकेने शनिवारी रात्री इराणवर पुन्हा एकदा मोठे हवाई हल्ले केले. ’स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावरून जाणाèया सायप्रसच्या एका मालवाहू जहाजावर इराणच्या ’इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने हल्ला केला होता. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही लष्करी कारवाई केली आहे. या आठवड्यातील अमेरिकेचा इराणवरील हा तिसरा मोठा हल्ला आहे.
अमेरिकेचे इराणला चोख प्रत्युत्तर
अमेरीकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, सायप्रसचा ध्वज असलेल्या ’एम/वी जीएफएस गॅलेक्सी’ या कंटेनर जहाजावर इराणने हल्ला केला होता. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन रूमचे मोठे नुकसान झाले असून जहाजाला आग लागली. तसेच चालक दलातील एक व्यक्ती बेपत्ता झाला आहे. इराणला यापूर्वीही व्यावसायिक जहाजांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल इशारा देण्यात आला होता आणि शांतता कराराचे पालन करण्याची संधी दिली होती. मात्र, इराणने पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अमेरिकेने दिली.
इराणमध्ये अनेक ठिकाणी भीषण स्फोट
अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यानंतर इराणमध्ये अनेक भागात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, केश्म बेटावर भीषण स्फोट झाले. तर इराणच्या सरकारी वाहिनीने बंदर अब्बास आणि सीरिक या भागातही अनेक स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. कमर्शिअल जहाजांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता नष्ट करणे हा या अमेरिकन हल्ल्यांचा मुख्य उद्देश होता.