भोंदूबाबाने पुजेच्या नावाखाली केला महिलेवर बलात्कार

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Bhondubaba Sanjay Shirode घरात शांती टिकून राहण्यासाठी आणि मुलाला नोकरी लागण्यासाठी होम-हवन करण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या भोंदूबाबाने महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करीत वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली. भोंदूबाबाच्या त्रासाला त्रस्त महिलेने हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली. संजय रामदास शिरोडे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तुकडोजी चौकात एमएसईबी कार्यालयात चौकीदार आहे.
 
 
bhondu bab a
मिळालेल्या माहितीनुसार, महिला मजुरीचे काम करते. आरोपी भोंदूबाबा संजय शिरोडे याच्याशी महिलेच्या पतीची पहिली भेट १६ जून रोजी म्हाळगीनगर दुय्यम निबंधक कार्यालयात झाली. यावेळी पीडितेच्या पतीला आरोपीने मुलाला म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने दाम्पत्याला मुलाचे कागदपत्र मागितले. नोकरी मिळवून देण्यासाठी एका विशेष पूजेची आवश्यकता असल्याचे सांगितले. २७ जून रोजी आरोपी पूजेचे साहित्य घेऊन पुन्हा त्यांच्या घरी गेला. पूजा सुरू असताना, त्याने महिलेच्या पतीला आणि मुलाला जंगलात जाऊन पळस झाडांची पाने आणण्यासाठी बाहेर पाठवले. घरात इतर कोणीही राहू नये, असा आग्रह त्याने धरला. महिला घरात एकटी घरात असताना, त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्यास तुला पाप लागेल, घरातील शांती भंग पावेल, तुझा पती आणि मुलाच्या जीवाला धोका होईल, अशी धमकी दिली. त्यानंतर भोंदूबाबाने महिलेला बळजबरीने बेडरूममध्ये नेले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तो सातत्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी करायला लागला. शारीरिक संबंध ठेवल्यास मुलाला नोकरी मिळवून देईल, कुटुंबात समृद्धी आणेल आणि त्यांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करेल, असे आश्वासन आरोपीने दिले होते. तिने विरोध केला. त्यावरून आरोपीने त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आणि ही घटना कोणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी ती महिला काही दिवस गप्प राहिली. दरम्यान ५ जुलै रोजी आरोपीने कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर तिने अखेर आपल्या पतीला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्या दाम्पत्याने हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संजय शिरोडे याला अटक केली.
अनेक महिला बळी?
भोंदूबाबा संजय शिरोडे हा अनेकांच्या घरी पूजा आणि होम-हवन करायला जातो. त्यामुळे त्याने अन्य महिलांनाही आपल्या वासनेचा बळी ठरविल्याची शक्यता आहे. तो जादूटोणा करण्याची धमकी देऊन महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस येऊ शकतात. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.
आरोपीने अशाच प्रकारे इतर कुटुंबांनाही लक्ष्य केले होते का, याची पडताळणी पोलिस करत आहेत.