बुलढाणा विकासासाठी आ. संजय गायकवाडांचा दिल्लीत पाठपुरावा

*केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घेतली भेट

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
sanjay-gaikwad : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आ. संजय गायकवाड यांनी दि. १२ जुलै रोजी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध विकासकामांसाठी मंजुरी, निधी उपलब्ध करून देणे तसेच संबंधित विषयांमध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सविस्तर निवेदनही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सादर केले.
 
 

sanjay-gaikwad 
 
 
 
भेटीदरम्यान आ. गायकवाड यांनी बुलढाणा—मलकापूर—चिखली महामार्गाच्या उभारणीची मागणी, ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा फॉरेस्ट परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसह वाहतूक सुलभतेसाठी फ्लायओव्हर उभारण्याची मागणी, बुलढाणा शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहरातून जाणार्‍या रिंग रोडची उभारणी, बुलढाणा शहरासाठी प्रस्तावित मिनी विमानतळास मंजुरी, बुलढाणा—बर्‍हाणपूर—मलकापूर नवीन रेल्वेमार्गाची उभारणी, तसेच राजूर घाटाचे दुहेरीकरण या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती देऊन या सर्व प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी व आवश्यक निधी मिळावा, अशी आग्रही मागणी केली...!
 
 
याशिवाय, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, दळणवळण, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच विकासाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवरही आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मतदारसंघातील नागरिकांच्या हिताच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. विकासकामे अधिक गतीने मार्गी लागण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
 
केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आमदार गायकवाड यांनी मांडलेल्या सर्व मागण्या व विकासकामांबाबतची माहिती लक्षपूर्वक ऐकून संबंधित विभागामार्फत त्यांचा सकारात्मक विचार करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी नगरपालिका पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक बबलू मावतवाल, नगरसेवक युनुस कुरेशी, कार्यकारी अभियंता काळे तसेच स्वीय सहाय्यक रोहित गवळी उपस्थित होते.