कारंजा लाड,
city-issues : शिवसेना नेत्या आ. भावनाताई गवळी व खा. संजयभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहर शिवसेनेने काही दिवसापूर्वी शेतकरी शेतमजूर व शाळेच्या निर्णयाबाबत आवाज उठवल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा आता शहरातील विविध समस्यांकडे वळविला असून, त्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिवसैनिकांनी नमूद केले की, यावर्षी काही अंशी पावसाळा सुरु झाला असून, काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शहरातील बर्याच भागात पाणी साचण्याचे प्रकार घडले आहे. भविष्यात विविध आजारांनी डोके वर काढु नये तसेच नागरिकांना साथीच्या रोगाची लागण होऊ नये म्हणून वेळोवेळी नाले सफाई करण्यात यावी अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी व अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांना केली आहे.
तसेच पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढत असल्यामुळे डास, किटक व माश्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्वत्र धुर फवारणी करण्यात यावी व शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा साचलेला असून, त्यामधुन दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना त्या रस्त्यावरून जाणे येणे कठीण झाले आहे. सध्या शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नाही. पावसाळ्यात नाल्या तुडुंब भरून त्यातील घाण पाणी रस्त्यावरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळेत नालेसफाई न झाल्यास डासांचे प्रमाण वाढुन डेंगू, मलेरीया व गॅस्ट्रो यासारखे आजार बळावण्याचा धोका आहे.
तसेच मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या कॉलनीतील नाल्या, रस्ते, लाईट तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, घंटागाडीची संख्या वाढवून नियमित पणे प्रत्येक वॉर्डात पाठविण्यात यावे, जांब रस्त्यावर टाकलेला कचरा जाळण्यात येत असल्याने त्यातुन निघणार्या विषारी द्रव्य व धुरामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून, कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता प्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे, ज्या भागात शाळा व कॉलेज आहे त्या परिसरातील रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे, शहरातील मुत्रीघराची संख्या वाढविण्यात यावी तसेच यापूर्वी बांधण्यात आलेले मुत्रीघर व शौचालय नियमित पणे स्वच्छ करण्यात यावे, आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सव व जैनांच्या पर्युषण पर्वासह इतर विविध धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणावी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. या मागण्यांकडे तातडीने लक्ष घालून त्या सोडविण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरुण बिकड, शहर संघटक संदेश जिंतुरकर , विलास डोंगरे व संतोष परसवार उपस्थित होते.