वर्धेत स्टूल ठेवत वाहनासाठी जागेवर हक्क!

*विठ्ठल मंदिर मार्गावर सकाळचे दृश्य

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
claiming-a-parking-spot : वर्धेत एैकावे ते नवलच आणि बघावे ते आश्चर्यच अशी परिस्थिती आहे. सध्या कोणीच कोणाचे समजून घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. वाहतुकीची तर पार वाट लागली आहे. अतिक्रमण एक दिवस रस्तेच गिळंकृत करते की काय असे वाटू लागले आहे. पार्किंगसाठी तर जागाच राहिलेली नाही. अशात विठ्ठल मंदिर मार्गावर सकाळी स्टूलची रांग ठेवली असल्याचे चित्र दिसते. एक ठराविक चार चाकी वाहन येऊन उभे झाले की ते स्टूल गायब होतात. आतापर्यंत एसटीत रूमाल टाकून जागा पकडण्याचा प्रकार होता. वर्धेत स्टूल ठेवत जागेवर हक दाखवण्याचा प्रकार पुढे आला आहे.
 
 

J 
 
 
आज वर्धेची अवस्था फार वाईट झाली आहे. रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत, फुटपाथ अदृश्य होत आहेत आणि सार्वजनिक जागांवर खासगी मालकीचा शिक्का मारल्या जात आहे. नगर पालिका प्रशासनाचे त्याकडे प्रामाणिकपणे दुर्लक्ष होत आहे. शिवाजी चौक ते बजाज चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग. या मार्गावर बँका, हॉटेल्स आणि अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनं थेट रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे रस्ता पार्किंगसाठीच का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मंदिर मार्गावरील एक चित्र तर अधिकच बोलके आहे. एका रुग्णालयासमोर सकाळपासून स्टूल ठेवून जागा अडवून ठेवली जाते. संबंधित चारचाकी वाहन येण्याची चाहूल लागताच स्टूल बाजूला होतात आणि सार्वजनिक रस्त्यावर जणू हक्क असल्याप्रमाणे कार दिमाखात उभी राहते. रस्त्यावर स्टूल ठेवून जागा राखीव करण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणारा आहे.
 
 
वर्धेत अतिक्रमणाने फूटपाथ गिळून टाकले असल्याने रस्त्यावरून चालने कठीण होते. पादचारी रस्त्यावर, वाहनांची कोंडी आणि अपघाताचा धोका नेहमीचाच झाला आहे. बालाजी हॉटेल, सोशॉलिस्ट चौकातील नॉव्हेल्टी आयस्क्रीम पार्लर परिसरातून सायंकाळी ६ ते ८ या वेळात पायी चालनेही कठीण होऊन जाते. इंदिरा मार्केट परिसरात सकाळी गॅरेजचे ट्रक उभे असतात. तर राजकला टॉकीज रोडवर दिवसभर किराणा दुकानदारांचे मालवाहू ऑटो उभे राहत असल्याने दुचाकी चालवणेही कठीण होते. निर्मल बेकरी ते साई मंदिर हा रस्ता दुकानांनी व्यापून टाकला आहे. शहरात पार्किंगच्या जागेचे मारामार आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक पाटील पोलिस स्टेशन ते शिवाजी चौकापर्यंत दिवसभर्‍यातून दहा बारा चकर मारत रस्त्यावरील वाहनं काढण्याचे स्वत:च माईकवरून आवाहन करतात. पण, आतल्या आडव्या रस्त्यांवर उभे अतिक्रमण झाले आहे. त्यात स्टूल ठेवत फुटपाथवरही हक सांगण्याचा प्रकार पुढे आल्याने प्रशासन तरी कुठे कुठे लक्ष देणार आहे.