वर्धा,
illegal-bank-account : क्रिकेट बेटिंग व ऑनलाईन जुगारासाठी लोकांचे अवैधरीत्या बँक खाते वापरणार्या पसार आरोपी दीपेश पंजवानी रा. दयालनगर याला अटक करण्यात आली.
माहितीनुसार, तन्मय भगत, सनी होलानी रा. समतानगर हे दोघेही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते. १५ मे २०२६ रोजी तन्मय भगत व २ जून २६ रोजी सन्नी होलानी यांना नागपूर येथून अटक करत पीसीआर घेतला होता. पोलिस तपासात दोघेही वर्धेतील गरजू व विद्यार्थ्यांना हेरून त्यांना खोटी माहिती देऊन त्यांना दोन ते तीन हजार रुपये देऊन त्यांच्या नावाने मोबाईल सिम कार्ड, वेगवेगळ्या बँकेचे खाते उघडून, संबंधित बँकेचे पासबुक, चेकबुक प्राप्त करत होते. ते पासबुक व चेकबुक दीपेश सेवलानीरा दयालनगर, अंकुर जैन रा. पाटनी ले आउट सिव्हिल लाईन, पंकज ऊर्फ पंकू लालवाणी रा. जरीपटका नागपूर, दीपेश पंजवानी रा. दयालनगर यांना विक्री केल्याची माहिती दिली.
याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी दीपेश सेवलानी, अंकुर जैन, पंकज ऊर्फ पंकू लालवाणी यांना अटक केली होती. मात्र, घटनेपासून दीपेश पंजवानी पसार होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्यामुळे आता पुन्हा नवीन काही समोर येणार आहे.
आरोपींनी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करत त्यांच्या नावाचे बँक खाते उघडले आहेत. त्या बँक खात्याचे आरोपींनी स्वतःकडे खात्याला लिंक असलेले मोबाईल सिम कार्ड, पासबुक, चेक बुक घेऊन त्या माध्यमातून क्रिकेट बेटिंग, ऑनलाईन जुगार, महादेव अॅप, विन अड्डा, फेअर प्ले, लोटस ३६५, रेड्डी अन्ना, दुबई एस्चेंज अशा ऑनलाईन जुगाराकरिता वापरल्याचे समोर आले आहे.
आरोपी तन्मय भगत व सनी होलानी यांनी तक्रारकर्ता प्रतीक लोखंडे व त्याचा मित्र दक्ष वासनिक यास फायनान्सच्या कामाकरिता बँक खात्याची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून दोघांच्या नावाने बँकेत खाते उघडून खात्याचे पासबुक व एटीएम कार्ड स्वतः जवळ ठेवले होते. तक्रारकर्ता यास पैशाची आवश्यकता असल्यामुळे आरोपीकडे पासबुक मागितले. त्यावेळी पासबुक देण्यास नकार दिला. मात्र, तक्रारकर्ता यास पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी धनादेशाच्या माध्यमातून ४० हजार काढले. याबाबत आरोपींना माहिती झाल्याने तक्रारकर्ता यास पैसे मागण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली असता खात्यामध्ये एका महिन्यात जवळपास २२ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मिळाली. याबाबत फिर्यादीने आरोपींना विचारपूस केली असता आरोपींनी त्यास उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.