कारंजा लाड,
accident-news : कारंजा-अमरावती राज्य मार्गावरील टाकळी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सायकल स्वार शेतकरी दादाराव सुभाष सोनोने (वय ४५) रा. कामरगाव यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेने कामरगाव परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेतात जाऊन काम आटोपून लगेच परत येतो, असे घरच्यांना सांगून सायकलवरून निघालेल्या एका कष्टकरी शेतकर्याला नियतीने वाटेतच गाठले. दादाराव सोनोने दुपारी आपल्या शेतातील कामासाठी सायकलवरून निघाले होते. ते टाकळी फाट्याजवळ पोहोचताच अमरावतीकडून कारंजाच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या एमएच २७ ईसी ७५०५ क्रमांकाच्या कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की, परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आले. धडकेमुळे सायकलचा अक्षरशः चुराडा झाला. दादाराव सोनोने हे अनेक फूट अंतरावर फेकले जाऊन गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला नाही.
उलट मानवतेचा परिचय देत त्याने तत्काळ जखमी दादाराव सोनोने यांना आपल्या वाहनातून कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, त्यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अमरावतीकडे नेत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान, कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गतिरोधक, सीसीटीव्ही, इशारा फलक व इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात तसेच मृताच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.