गोंदिया,
praful-patel : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे होणार नाही तर बावनकुळे होतील असे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केले होते. यावर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यात शेतकरी, गोरगरीब, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा (रस्ते) अशा अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत उल्लेखनीय विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री राहावे, ही सर्वांचीच ईच्छा आहे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.

खा. पटेल यांनी 12 जुलै रोजी गोंदिया येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रसंगी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भाजपवर सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप केले. या पार्श्वभूमीवर खा. पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बदलण्याचा किंवा पाडण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने तिथे लोकशाही परंपरेनुसार सरकार स्थापन झाले आहे. जर एखाद्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील किंवा इतर काही कारणांमुळे आमदारांची ये-जा होत असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरणे आणि त्यांना यामध्ये ओढणे अजिबात योग्य नसल्याचे ते म्हणाले. प्रसंगी विरोधकांकडून राम मंदिर मध्ये चोरी प्रकरणी होत असलेल्या आरोपांविषयी त्यांना विचारले असता राम मंदिर मध्ये जे झाले ते चुकीचे झाले. मात्र, एका मंदिरामध्ये जर असं झालं तर दुसर्या मंदिरामध्येही तसंच होईल, हे समजणे चुकीची आहे. असे ते म्हणाले. दरम्यान, अमित शहा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता फोन केला होता असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. यावर प्रफुल पटेलांच्या प्रतिक्रीया घेतल्या असता त्यांनी एकनाथ खडसे सध्या कुठे आहेत, हे त्यांनी ठरवावे. असा खोचक सल्ला खडसेंना दिला.