पुनर्वसू ७० टक्के कोरडे; शेतकरी हवालदिल

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
farmers-distressed : तब्बल सात वर्षांनंतर यंदा पुनर्वसू नक्षत्र ७० टक्के कोरडे जाण्याची शक्यता दिवसागणिक बळावत आहे. त्यामुळे उशिरा लागवड केलेली किंवा उलटलेल्या पेरण्या झालेली शेतं कोरडी ठाक राहण्याचा धोका जाणवत आहे.
 
 
 
farmers-distressed
 
 
 
यंदा, मोसमी वार्यांनी दगा दिल्यामुळे मृग नक्षत्राचा पाऊस फिरकलाच नाही. आद्र्रा नक्षत्राच्या बरसलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी एकदाचे पेरते झाले! परंतु, पुनर्वसू आणि नंतरचे पुष्य नक्षत्र दरवर्षी भरपूर पावसाचे असतात, हे समजून शेतकर्यांनी उलटलेल्या सोयाबीनच्या शेताला सजविण्याचा संकल्प केला. मात्र, पुनर्वसू नक्षत्रानेही दगा दिल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने पूर्व विदर्भात २० जुलैपर्यंत दमदार पाऊस होण्याची शक्यता दिसत नसल्याचे म्हटल्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुष्य नक्षत्राचे वाहन उंदीर असल्यामुळे त्या नक्षत्राचा देखील भरवसा नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. उगवलेली पर्हाटी जगविण्यासाठी शेतकरी डवरणीच्या माध्यमातून माती पलटवण्याचे काम करीत आहे. परंतु, ज्यांनी तणनाशकाची फवारणी केली, त्यांच्या शेतातील उष्णता वाढत असून कपाशीची झाडं कधी ‘हे राम’ म्हणतील सांगता येत नाही. दरम्यान ३ ते ४ मिमी पावसाची एक सर बरसावी अशी अपेक्षाही शेतकर्यांनी व्यक्त केली.
 
 
सन २०१९ आणि २०१३ मध्ये आषाढी एकादशीला दमदार पाऊस झाला होता. मात्र, यंदा अधिक मासामुळे हा कालावधी वाढला आणि त्याचा जबर फटका या परिसरातील २३ हजार हेक्टर क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे.