कॅन्सस सिटी,
fifa world cup 2026 फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनाने आणखी एक दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा ३-१ असा पराभव केला आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. त्यानंतर अर्जेंटिनाने दोन गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. आता १६ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत स्वित्झर्लंडवर दबाव निर्माण केला. त्याचे फलित १० व्या मिनिटाला मिळाले. ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टरने अचूक गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्वित्झर्लंडने बरोबरी साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र पहिल्या सत्रात त्यांना यश आले नाही आणि मध्यंतरापर्यंत अर्जेंटिना आघाडीवर राहिला.
दुसऱ्या सत्रात मात्र स्वित्झर्लंडने जोरदार पुनरागमन केले. डॅन डोयेने ६७ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर निर्धारित वेळेत दोन्ही संघांना आणखी गोल करता आला नाही आणि सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. विश्वचषकाच्या इतिहासात अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत गेलेला हा १३ वा सामना ठरला. त्यामुळे विश्वचषकात सर्वाधिक वेळा अतिरिक्त वेळ खेळणारा संघ म्हणून अर्जेंटिनाची नोंद झाली आहे.
अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाने पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा प्रत्यय दिला. ११२ व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने १८ यार्डांवरून अचूक फटका मारत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या क्षणी लॉटारो मार्टिनेझने आणखी एक गोल करत विजय निश्चित केला आणि अर्जेंटिनाला अंतिम चारमध्ये पोहोचवले. या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत धडक मारली असून १६ जुलै रोजी त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. तर पहिली उपांत्य फेरी १५ जुलै रोजी फ्रान्स आणि स्पेन यांच्यात रंगणार आहे.