आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये गांगुली अन् अंजुमचा गौरव

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
दुबई,
ganguly and anjum honoured आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गजांना मोठा सन्मान देत माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा यांचा आयसीसीच्या प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश केला आहे. त्यांच्यासोबत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनलाही या मानाच्या यादीत स्थान मिळाले. ११ जुलै रोजी या तिन्ही दिग्गजांचा अधिकृतपणे 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि दीर्घकालीन योगदान देणाऱ्या खेळाडूंना हा सन्मान दिला जातो.
 
ganguly and anjum honoured
 
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी या तिन्ही दिग्गजांचे अभिनंदन करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. क्रिकेटचा विकास आणि लोकप्रियता वाढविण्यात या खेळाडूंची भूमिका मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले. सौरव गांगुली हे आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळवणारे दहावे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत.
 
सौरव गांगुली यांनी १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८ हजार ५७५ धावा केल्या. १९९६ मध्ये लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पणात शतक झळकावत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळणे हा आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याची भावना गांगुली यांनी व्यक्त केली.
 
अंजुम चोप्रा या आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. यापूर्वी नीतू डेव्हिड आणि डायना एडुलजी यांना हा बहुमान मिळाला होता. अंजुम यांनी तब्बल १७ वर्षे भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साडेतीन हजारांहून अधिक धावा केल्या. १०० एकदिवसीय सामने खेळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या होत्या. तसेच २००५ च्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याचाही या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला. पीटरसनने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ हजार ७९७ धावा केल्या आहेत. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी आयसीसीचे आभार मानत हा क्षण आपल्या कारकिर्दीतील विशेष सन्मान असल्याचे सांगितले.