नवी दिल्ली,
gold-silver-price : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि महागाईच्या आकडेवारीवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, मौल्यवान धातूंच्या किमतींमधील घसरणीचा हा कल तूर्तास काही काळ असाच सुरू राहू शकतो.
जागतिक तणावाचा बाजारावर परिणाम
पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठ पुन्हा एकदा चिंतेत आहे. इराणने नुकतीच होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली होती, ज्याला उत्तर म्हणून अमेरिकेने इराणवर हल्ले केले. या बदल्यात इराणने संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि बहरीन मधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केले. या वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि अमेरिकन डॉलर तसेच सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय अधिक मजबूत होऊ शकतात, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव वाढेल.
मागील आठवड्यात किमतींमध्ये मोठी घसरण
देशंतर्गत वायदा बाजारपेठेत मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्याच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३,९०० रुपयांनी (२.६५ टक्के) घसरून १.४३ लाख रुपयांवर बंद झाला. तर सप्टेंबर महिन्याच्या डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव प्रति किलो १४,७४६ रुपयांनी (६.२ टक्के) घसरून २.२२ लाख रुपयांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांकडून नफावसुली
बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती, कच्च्या तेलाचे उच्च दर आणि व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. किमती वाढण्याच्या प्रत्येक प्रयत्नानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमवण्यासाठी विक्री केल्यामुळे किमतींमध्ये सुधारणा होऊ शकली नाही. भारतीय रुपयातील किरकोळ घसरणीमुळे देशांतर्गत बाजाराला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जागतिक बाजारपेठेतील घसरणीमुळे हा प्रभाव कमी झाला.
तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय घडामोडींशिवाय आता बाजारपेठेचे लक्ष भारत, युरोपियन युनियन आणि अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर असेल. तसेच अमेरिकेतील किरकोळ विक्री आणि इतर आर्थिक आकडेवारीवरून पुढील धोरणांचे संकेत मिळतील, ज्यावर सोन्या-चांदीची आगामी वाटचाल अवलंबून असेल.