वर्धा,
goras-bhandar : अन्न व औषध प्रशासनाने महात्मा गांधींनी सुरू केलेल्या गोसर भंडारमधील अस्वच्छतेवर ठपका ठेवत कारवाई केली. न्यायालयाने ‘न्याय’ देत गोरस भंडार पुन्हा सुरू करण्याच्या सुचना केल्या. यातून धडा घेत गोरस भंडार प्रशासन कात टाकत आहे. जवळपास १५ दिवसांनी गोसर भंडार वर्धेकरांच्या सेवेत रूजू होणार आहे.
नव्या टाइल्स, नाली बांधकाम, रंगरंगोटी यासारखी कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी आणखी किमान १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शयता आहे. यानंतर गोरस भंडार उघडून नागरिकांना त्यांचा गोरस पाक उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर अन्न व औषध प्रशासनाने गोरस भंडारवर केलेली कारवाई रद्द करण्यात आली आहे. यानंतर गोरस भंडार लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा वाढली. तत्पूर्वी कारवाईदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर गोरस भंडारच्या व्यवस्थापनाने भर दिला आहे. मुळात गोरस भंडार असलेली जागा भाडेतत्वावर घेण्यात आली. या जागेत कुठलीही दुरुस्ती करायची असल्यास जागेची मालकी असलेल्या संस्थेची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे आजवर येथे टाइल्स बसविण्यासह मोठ्या सुधारणा करण्यात आल्या नव्हत्या. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्वच्छतेचा मुद्दा समोर आला होता. याशिवाय स्वच्छता कायम राहावी म्हणून टाइल्स बसविण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने केली होती. या सूचनांवर तत्काळ अंमलबजावणी करण्यावर व्यवस्थापनाने भर दिला आहे.
गोरस भंडारच्या बेकरी विभागात टाइल्स आणि मार्बल बसविण्यात येणार आहे. किचनचा भागदेखील दुरुस्त करून अधिक आकर्षक केला जाणार. दूध विभागात ‘ग्राउंड सरफेस’सह भिंतीला टाइल्स लावली जाणार आहे. गोरस भंडार नेमके कधी सुरू होणार याविषयी माहिती घेण्यासाठी ग्राहक दरदिवशी गोरस भंडारमध्ये चकरा मारत आहेत.