लंडन,
linda noskov विम्बल्डन २०२६ महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या २१ वर्षीय लिंडा नोस्कोव्हाने स्वदेशीय कॅरोलिना मुचोव्हाचा २-१ असा पराभव करत कारकिर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आपल्या नावावर केले. ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर ११ जुलै रोजी झालेल्या या अंतिम लढतीत तीन सेटपर्यंत रंगलेला संघर्ष अखेरीस नोस्कोव्हाच्या बाजूने झुकला. विजेतेपदासह तिला सुमारे ३८५ कोटी रुपयांची (सुमारे ३८५ दशलक्ष रुपये) बक्षीस रक्कमही मिळाली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच लिंडा नोस्कोव्हाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अवघ्या ३२ मिनिटांत तिने पहिला सेट ६-२ असा जिंकत सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला दुहेरी स्पर्धेत नोस्कोव्हाची जोडीदार राहिलेल्या कॅरोलिना मुचोव्हाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. तिने ७-५ असा सेट जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला आणि अंतिम सामना अधिक रंगतदार बनवला.
निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मात्र २१ वर्षीय नोस्कोव्हाने पुन्हा एकदा आपल्या खेळाची धार दाखवली. दुसरा सेट गमावल्यानंतर तिने आक्रमक खेळ करत ६-३ असा सेट जिंकला आणि विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ऐतिहासिक विजय मिळताच आनंदाच्या भरात ती कोर्टवरच कोसळली.
महिला एकेरीचे विजेतेपद निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विम्बल्डन २०२६ पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. १२ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जॅनिक सिनर आणि दुसऱ्या क्रमांकावरील अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे.