वाराणसी,
minor girl sold out of greed for money उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला एक लाख रुपयांत विकल्याचा आणि जबरदस्तीने तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणानंतर पीडितेला तीन दिवस ओलीस ठेवण्यात आले होते. या प्रकरणी चौबेपूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील निष्काळजीपणाबद्दल चिरायगाव चौकीचे प्रभारी महेश मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे.
वरुणा विभागाचे डीसीपी प्रमोद कुमार, एडीसीपी लिपी नागाईच आणि एसीपी सारनाथ विनय द्विवेदी यांनी या कारवाईची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चौबेपूरमधील लखरंक कामौली गावातील राहुल भारद्वाज, त्याचा काका शिवधनी, काकू मैना देवी तसेच मथुरा येथील नेम सिंग यांचा समावेश आहे. राहुल भारद्वाज याने नेम सिंग याच्याशी संपर्क साधला होता. नेम सिंग याने लग्नासाठी मुलगी उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी मानसिकदृष्ट्या काहीशी अस्वस्थ असून तिच्या आईचे यापूर्वी निधन झाले आहे. ६ जून रोजी सकाळी ती घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर तिच्या काकांनी चौबेपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. २२ जून रोजी पोलीस आयुक्तांच्या जनसुनावणीतही याबाबत अर्ज देण्यात आला, तरी मुलीचा शोध लागला नाही.
अखेरीस ३ जुलै रोजी पीडित मुलीने स्वतः तिच्या चुलत बहिणीला फोन करून आपल्याला कानपूरमध्ये एक लाख रुपयांना विकण्यात आल्याची माहिती दिली. तसेच राहुल भारद्वाज याने यापूर्वीही अशाच प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप तिने केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ५ जून रोजी राहुल आणि साहिल या दोघांनी तिचे अपहरण करून तिला जबरदस्तीने एका नातेवाईकाच्या घरी तीन दिवस ओलीस ठेवले. त्यानंतर बुलंदशहर येथील २० वर्षीय मजूर तरुणाशी तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात नेम सिंग याने मध्यस्थाची भूमिका बजावत एक लाख रुपयांचा सौदा निश्चित केला होता. पीडितेच्या फोननंतर ५ जुलै रोजी पोलिसांनी अपहरण, मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आणि मुलीची सुटका करण्यात आली. सध्या तिचे समुपदेशन सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.