- चहाविक्रेत्याला केली अटक
अनिल कांबळे
नागपूर,
Murder of tea customer चहा घेतल्यानंतर चहाचे दहा रुपये न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत चहा विक्रेत्याने ग्राहकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना आज रविवारी दुपारी चार वाजता कपीलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारी-नारा परिसारत घडली. मनोज विश्वनाथ यादव (४५) रा. दर्शननगर, नंदनवन असे खून झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. कैलास लालचंद गणवीर (४२) रा. न्यू म्हाडा कॉलनी, उप्पलवाडी असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज यादव हा एका डेकोरेशन मालकाकडे कामाला होता. रविवारी सकाळी तो उप्पलवाडी परिसरात मंडप बांधण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास तो कैलासच्या चहाटपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. चहा घेतल्यानंतर त्याने चहाचे दहा रुपये दिले नाही. त्यामुळे चहाविक्रेत्याने मनोजला चहाचे दहा रुपये मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत मनोजने कैलासच्या पत्नीसमोर त्याला एक थापड मारली. त्यामुळे कैलास संतप्त झाला. त्याने धारदार शस्त्राने मनोजच्या मानेवर वार केला. त्यामुळे तो कोसळला. उपचारासाठी त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. ठाणेदार सतीश आडे यांच्या पथकाने तासाभरात आरोपीला अटक केली.