गोंदिया,
mystery-behind-tigers-death : एनएनटीआरच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील गट क्रमांक 181 मधील रोशन कटरे या शेतकर्यांच्या शेतातील विहिरीत वाघाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी 11 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. दरम्यान, आज, रविवारी 12 जुलै रोजी नवेगाव-नागझिरा प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचार्यांनी श्वान पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी एनटीसीएच्या प्रचलीत प्रमाणकानुसार सदर वाघाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. मात्र, सदर वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्या वाघाच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे.

मुरदोली येथील शेतकरी रोशनलाल कटरे हे आपल्या शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांना विहिरीतील पाण्यात वाघाचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी घटनेची माहिती सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली. दरम्यान, आज, रविवारी एनटीसीएचे प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी सावन बहेकार, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक पियुषा जगताप, उपसंचालक प्रीतमसींग कोडापे यांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास सदर वाघाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. व्ही. खुणे, डॉ. समीर शेंद्रे, डॉ. कृपावन उईके, डॉ. उज्ज्वल बावनथडे व डॉ. मेघराज तुळावी यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीका परिसरात मृत वाघाचे शवविच्छेदन करून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर वाघ एक ते दिड वर्षाचा मादा वाघ असून गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाण्यात असल्याने मृतदेह कुजलेला स्थितीत होता, त्यामुळे मृत्यूचे कारण संबंधित डॉक्टरही स्पष्ट करू शकले नाही. दरम्यान, वाघाच्या मृतेदहाचे नमूने पुढील वैद्यकीय तपासणीकरीता पाठविण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाची नोंद नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक विपीन लांडगे करीत आहेत.