- १६६ बंद्यांच्या २८३ पाल्यांनी घेतली आई-वडिलांची भेट;
अनिल कांबळे
नागपूर :
Nagpur Central Jail अनेक महिन्यांपासून आई-वडिलांच्या मिठीसाठी आसुसलेल्या चिमुकल्यांना अखेर आपल्या पालकांना घट्ट मिठी मारण्याची संधी मिळाली आणि कारागृहातील कठोर भिंतीही त्या भावनिक क्षणांच्या साक्षीदार ठरल्या. महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहात शनिवारी 'गळाभेट' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या पुरुष व महिला बंद्यांच्या १८ वर्षांखालील मुलांना, भावंडांना आणि नातवंडांना कारागृहात प्रत्यक्ष भेटण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमात १६६ बंद्यांच्या २८३ पाल्यांनी आपल्या आई-वडिलांची तब्बल ३० मिनिटे प्रत्यक्ष भेट घेतली. सुरुवातीला भीती, संकोच आणि अनोळखीपणामुळे काही मुले गप्प उभी होती. मात्र काही क्षणांतच त्यांनी वडिलांच्या कुशीत शिरत त्यांना घट्ट मिठी मारली. काही जण बाबांच्या खांद्यावर खेळले, तर अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. त्या क्षणी कारागृहाचे वातावरणही भावनांनी भारावून गेले.
आईवरील कविता केली सादर
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. आयचित यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी, ‘माणसाकडून नकळत गुन्हा घडू शकतो. मात्र त्यातून बाहेर पडून वाल्याचा वाल्मीकी झाला, तसा प्रत्येकाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावा,’ असा संदेश बंद्यांना दिला. कार्यक्रमादरम्यान एका बंद्याच्या मुलाने आईवरील स्वतःची कविता सादर केली, तर अवघ्या सहा वर्षांच्या मुलीने गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी या दोन्ही बालकांचे विशेष कौतुक केले. भेटीदरम्यान बंद्यांना आपल्या मुलांसाठी बिस्किटे, चॉकलेट, वेफर्स, सोनपापडी, चिवडा यांसारख्या खाद्यपदार्थांची व्यवस्था कारागृहातील उपहारगृहातून उपलब्ध करून देण्यात आली. अनेकांनी आपल्या कारागृहातील वेतनातून मुलांसाठी खाऊ घेतला आणि स्वतःच्या हाताने भरवला. कारागृह प्रशासनानेही सर्व पाल्यांना पुलाव, फळे आणि अल्पोपहार दिला.