वर्धा,
purnabrahma-campaign : स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान शाखा वर्धा यांच्या संयुक्त वतीने शांती नगर, उमरी (मेघे ) येथील सिटीझन होम या वृद्धाश्रमात राहणार्या ज्येष्ठांच्या भोजनासाठी धान्य आणि इतर खाद्य सामुग्रीचे वितरण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान तर्फे पूर्णब्रह्म अभियान ही योजना अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या सौजन्याने धान्य वाटप करण्यात आले.
स्वामी समर्थ मंदिराच्या सभा मंडपात वर्धा जिल्हा नियोजन आणि विकास समितीचे सदस्य जयंत कावळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे राष्ट्रीय सचिव डॉ. राजू मिश्रा यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आश्रम संचालक अविनाश नानोटे यांनी खाद्य सामग्री स्वीकारली.
ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणारा आणि ज्येष्ठांना स्वाभिमानाने जगता येईल अशा संस्कारित समाजाची पुनस्र्थापना करणे हाच ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. राजू मिश्रा म्हणाले. वर्धा ही सेवा नगरी आहे येथे प्रत्येक क्षेत्रात सेवा कार्याला वाहून घेतलेले अनेक सामाजिक नेते आहेत, असे जयंत कावळे म्हणाले. दामोधर राऊत यांनीही मार्गदर्शन केले. मंदिर समितीचे अध्यक्ष अरुण भुरे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे वर्धा संयोजक मनोहर पंचारिया यांनी संचालन केले. अविनाश नानोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या वर्धा जिल्हा निरीक्षक कालिंदीनी ढुमणे, वर्षा मैदलकर, राहुल अवधनकर, शालिनी यादव, रामदास जारूडे उपस्थित होते.