पराग मगर
नागपूर :
'Rahe Na Rahe Hum...' programme अरुणाई आणि सप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांवर आधारित ‘रहे ना रहे हम...’ हा सुरेल संगीत कार्यक्रम शनिवारी कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आय.टी. पार्क, गायत्रीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील गाजलेल्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश सोनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुरभी ढोमणे यांनी सादर केलेल्या ‘आएगा आनेवाला’ आणि ‘अजीब दास्ताँ है ये’ या गीतांनी झाली. त्यानंतर रसिका बावडेकर यांनी ओ सजना बरखा बहार आयी, जरा सी आहट होती है आणि पान खाये सैंया हमारो ही गाणी सादर केली. मुकुल पांडे आणि डॉ. निशिकांत लोखंडे यांनीही आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रम खुलविला. यावेळी जमीं से हमें आसमाँ, ये रात भीगी भीगी, प्यार किया तो डरना क्या, छोड़ दो आँचल, पिया पिया पिया मोरा, कुहू कुहू बोले कोयलिया, बैयाँ ना धरो, फूल तुम्हें भेजा है खत में, आप यूँ ही अगर हमसे मिलते रहे, लग जा गले, रहे ना रहे हम यांसारख्या अनेक अजरामर गीतांचे सादरीकरण करून गायक-कलाकारांनी लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या गीतांना आपल्या सुरांनी उजाळा देत रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाला वाद्यवृंदावर आर्य पुराणकर, प्रशांत खडसे, ऋग्वेद पांडे, उज्ज्वला गोकर्ण, अक्षय हरले आणि प्रमोद बावने यांनी उत्कृष्ट साथ दिली. संगीत संयोजन सचिन ढोमणे यांचे होते तर संयोजन रिषभ ढोमणे यांचे होते. यावेळी सप्तकचे सदस्य श्रीकांत देशपांडे, डॉ. उदय गुप्ते, नितीन सहस्त्रबुद्धे, विलास मानेकर, उदय पाटणकर, अरविंद चोपडे, विकास लिमये यांची उपस्थिती होती.