राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त पार्किंगचा कहर

- देवरीकरांचा जीव धोक्यात, प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेले जड वाहन

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
मुल्ला,
rampant-haphazard-parking : देवरी शहरातून जाणार्‍या रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. महामार्गाच्या कडेला ट्रक, कंटेनर व इतर जड वाहने सर्रास उभी राहत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
 
 

rampant-haphazard-parking 
 
 
तहसील कार्यालय, पंचायत समिती, बसस्थानक, न्यायालय, शाळा, महाविद्यालये, बँका व विविध शासकीय कार्यालये याच मार्गालगत असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाच्या कडेला नियमांचे उल्लंघन करून तासन्तास उभी राहणारी अवजड वाहने रोखण्यात वाहतूक पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वाढती वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण पथक तैनात करणे, नियमित गस्त वाढवणे आणि विनाकारण महामार्गावर वाहने उभी करणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने आताच कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
देवरीचा उड्डाणपूल आता विलंब नको...
 
 
देवरी शहरातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता उड्डाणपूल उभारणे ही आता केवळ मागणी नसून काळाची गरज बनली आहे. अनेक वर्षांपासून देवरीकर उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. उड्डाणपूल झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल आणि अपघातांचे प्रमाण घटेल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शासनाने देवरी उड्डाणपूल प्रकल्पाला तातडीने मंजुरी देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.