शिरपूर जैन,
prataprao-jadhav : शिरपूर येथील रिसोड फाटा ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे ११ जुलै रोजी शिरपूर दौर्यावर आले असता त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी रिसोड फाटा ते बसस्थानक या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा रस्ता गेल्या दहा वर्षांपासून खराब अवस्थेत असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतुक धोकादायक बनते, तर उन्हाळा व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने नागरिक, वाहनधारक व व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी संबंधित रस्त्याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या निवेदनावर शशिकांत देशमुख, शंकर वाघ, हसन पठाण, कैलास भालेराव, विलास देशमुख, संदीप देशमुख, अमर देशमुख, अमोल देशमुख, विजय कदम, सागर चोपडे, जाधव यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.