अर्जुनी मोरगाव,
temporary-residential-school : अर्जुनी मोरगाव येथे नव्याने सुरू होत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावरील इमारत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सदर पत्रानुसार, सामाजिक न्याय विभागामार्फत अर्जुनी मोरगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्षासाठी 65 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मात्र, शाळेची नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येत असली तरी तिचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे इमारत सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित होऊ शकलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दोन महिने अथवा दिवाळीपर्यंत कालावधी लागू शकतो. यामुळे निवासी शाळा सुरू होण्यास विलंब होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू राहावे यासाठी तातडीने योग्य ती भाडेतत्त्वावरील इमारत उपलब्ध करून निवासी शाळा सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी आ. बडोले यांनी केली आहे. तसेच, नवीन शाळेची इमारत पूर्णत्वास येऊन सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर निवासी शाळा त्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.