पुलगाव,
shankarprasad-agnihotri : शिक्षक ज्ञान, मूल्ये, शिस्त आणि राष्ट्रभावना रुजवतात; तर विद्यार्थी ते ज्ञान आचरणात आणून देशाची प्रगती घडवतात. त्यामुळे देशाला विश्वगुरू बनविण्यात शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. पुलगाव पॉलिटेक्निक व गांधीसिटी पब्लिक स्कूल येथे शिक्षक व विद्यार्थी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिक्षक केवळ विषय शिकवत नाहीत तर चारित्र्य, संस्कार आणि योग्य विचारांची पायाभरणी करतात. चांगले शिक्षक विद्याथ्र्यांमध्ये संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, नैतिकता आणि समाजभान निर्माण करतात.
शिक्षकांनी ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचवले तर सक्षम, प्रतिभावान आणि जबाबदार नागरिक घडतात. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत; त्यांनी अभ्यासाबरोबरच मूल्यसंवर्धन, शिस्त, श्रम, आणि समाजसेवा स्वीकारली पाहिजे. ज्ञान मिळवून त्याचा उपयोग समाजहितासाठी करणे, हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मुख्याध्यापक धनंजय शिंगणजुडे, प्राचार्य अमोल नाखले, शिक्षक शबाना खान, मनीषा होटे, सचिन उमक , पंकज बिरे, अभिजित रघुवंशी, गजानन पोकळे, गणेश काळे आदी उपस्थित होते.