जिवती,
telangana-administration : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या संगणापूर येथे तेलंगणा प्रशासनाकडून शेतकर्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवून पिक उध्दवस्त करण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल‘ होत आहे. या प्रकाराचा जिवती तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
या चित्रफीतनुसार तेलंगणा राज्यातील वनविभाग व पोलिस प्रशासनाने जबरदस्तीने शेतात प्रवेश करून शेतकर्यांच्या परिश्रमावर चक्क ट्रॅक्टर फिरवला. वृक्षलागवड करण्याच्या नावाखाली ही कारवाई केल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात ही कृती म्हणजे सीमाभागातील शेतकर्यांवर अन्यायाचा बुलडोझर चालवण्यासारखी असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिवती तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.
शेतकर्यांचे नुकसान होत असताना आमदार-खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. अनेकांनी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर सडकून टीका करीत, तात्काळ ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. सीमावादाच्या पृष्ठभूमीवर अशा प्रकारची एकतर्फी कारवाई ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, हा केवळ शेतकर्यांवरील अन्याय नसून, महाराष्ट्राच्या हक्कांवरदेखील गदा असल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ न्याय व योग्य भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे
दरम्यान, संबंधित चित्रफीत व्हायरल होत असली तरी या प्रकरणावर तेलंगणा वनविभाग, पोलिस प्रशासन किंवा संबंधित जिल्हा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेबाबत प्रशासनाने तत्काळ भूमिका स्पष्ट करून पीडित शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. सध्या या घटनेमुळे सीमाभागातील वातावरण चांगलेच तापले असून, प्रशासन व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठांना कळवून सत्य परिस्थिती समोर आणू : आम्रपाली खोब्रागडे
संबंधित शेतजमीन तेलंगणा राज्याच्या सिमेवर आहे. तेलंगणा प्रशासनाने सिमेवर खांब लावून तो परिसर वनजमीन म्हणून घोषित केला आहे. तसा फलकही तेथे लावण्यात आला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या बाबत पंचनामा होऊ शकला नाही. मात्र, सोमवारी वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन सत्य परिस्थिती जाणून समोर आणू, अशी प्रतिक्रिया जिवतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांनी दिली.