भेसळीचा बोकाळलेला भस्मासुर

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
रोखठोक..
 
दिनेश गुणे
adulteration ह्रदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो, असे म्हणतात. पण गेल्या काही दशकांत हा विचार मागे पडत चालला आहे. कॉर्पोरेट जगाने किंवा धंदेवाईकांच्या जाहिरातबाजीने जेव्हापासून ग्राहक नावाच्या वस्तूच्या मनावर कब्जा मिळविला, तेव्हा हा विचार मागे पडला, आणि ह्रदये जिंकण्याचा मार्ग निव्वळ जाहिरातबजीतून जातो हे सिद्ध होऊ लागले. जाहिरात हे ग्राहकास आकर्षित करण्याचे आणि संपूर्ण जीवनशैली बदलण्याची क्षमता असलेले प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध होऊ लागले, तेव्हापासून ग्राहकाने मन, ह्रदय आणि शरीर, त्वचा, कान, नाक, डोळे आणि सारे अवयव अंधपणाने जाहिरातविश्वाच्या स्वाधीन करून टाकले, आणि जाहिरात सांगेल तेच खरे, आणि जाहिरात सांगेल तेच करावयाचे असा प्रघात पडला. आता अशा तऱ्हेने प्राधान्य झालेल्या आणि धंदेवाईक जगाकडून जिंकल्या गेलेल्या ह्रदयांच्या व्यथा बोलक्या होऊ लागल्या आहेत. या जगाने आपल्या जाहिरातकलेतून ह्रदये जिंकली, पण त्यांची शक्ती मात्र हिरावून घेतली. एकदा ह्रदयावर ताबा मिळविला, की मनाला हवे तसे वळविण्याचे ताकदही मिळविता येते हे माहीत असलेल्या धंदेवाईकांच्या जगाने त्याचा फायदा घेत ग्राहक नावाच्या वस्तूला अक्षरशः वापरण्यास सुरुवात केली आणि ग्राहकांनीही त्यास मुक्त मुभा दिली, असे आता उघडकीस येऊ लागले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तू वापरल्या जातात, त्यांच्या ह्रदयावर, शरीरावर किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवावर तसेच मनावरही, कोणता परिणाम होतो याची जाणीवच हिरावून घेतली गेली आहे, असे या नव्या कारवायांतून स्पष्ट होऊ लागले आहे. जाहिरात हे ग्राहकांस आकर्षित करण्याचे साधन आहे असे मानले जाते.
 

adulteration 
 
 
आता तो समजही दूर होऊ लागला असून, जाहिरात हे ग्राहकास आकर्षित करण्याचे नव्हे, तर फसविण्याचे साधन आहे, असे वाटण्याजोगी परिस्थिती दिसू लागली आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे नावाच्या एका सनदी अधिकाऱ्याने हाती घेतला, आणि प्रशासन नावाची ही व्यवस्था सक्रिय झाली. याआधीही ही यंत्रणा अस्तित्वात होती. लहानमोठ्या कारवायादेखील या यंत्रणेकडून केल्या जात होत्या. पण त्यासाठी काही निमित्त असे. म्हणजे, सणासुदीच्या दिवसांत ज्या खाद्यपदार्थांचा वापर ग्राहकांकडून सणाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता केला जातो, अशा पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या धंद्यांवर धाडी टाकून काही मुद्देमाल जप्त केला जात असे. खवा, मावा, दूध, बनावट आणि खाण्यास योग्य नसलेल्या रंगांचा वापर करून आकर्षक बनविलेल्या मिठाया, आदी पदार्थ जप्त करून कारवाईचा मोठा गाजावाजाही केला जात असे. सणासुदीचा हंगाम संपला, की पुन्हा या पदार्थांचा बाजार आपल्या जुन्या पायवाटेवरून पुढे चालत असे, आणि पुन्हा जोरदार जाहिरातींच्या प्रभावामुळे ग्राहकासही अशा कारवायांचा विसर पडत असे. गेल्या अनेक दशकांत असे भेसळयुक्त, घातक रसायनांचा वापर केलेले आणि खाण्यास व आरोग्यास अपायकारक असलेले असंख्य पदार्थ बाजारपेठांनी केवळ जाहिरातबाजीच्या जोरावर ग्राहकांच्या माथी मारले असून त्यांच्या प्रचंड विक्रीतून अनेक उद्योगांनी आपली भरभराटही साधली आहे, हे आता उघड होऊ लागले आहे. म्हणूनच, तुकाराम मुंढे नावाच्या या सनदी अधिकाऱ्याने सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र वाचवा’ मोहिमेतून ग्राहकांच्या म्हणजे माणसाच्या आरोग्यास उपकारक असे काही कायमस्वरूपी निष्पन्न व्हावे अशी सामान्य माणसांची अपेक्षा आहे.
जेमतेम काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला, आणि अशा धंदांवरील धाडींचे सत्रसुरू झाले. आपण वापरतो ती सौंदर्य प्रसाधने, वेगवेगळ्या आजारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी किंवा जीवघेण्या आजारांच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी औषधे, विरंगुळा म्हणून किंवा चवबदल म्हणून खाल्ले जाणारे फास्ट फूड, सणासुदीच्या काळाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या स्वादिष्ट मिठाया, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जन्माला आल्यानंतर पहिल्यांदाच ज्याची चव बाळाला चाखविली जाते, ते आरोग्यास पोषक म्हणून पूर्णान्न मानले जाणारे दूधदेखील भेसळयुक्त अथवा कृत्रिम आहे, आणि अलीकडे बळावलेले अनेक आजार अशाच काही भेसळयुक्त पदार्थांमुळे होत आहेत, याची जाणीव आता जागी होऊ लागली आहे. नागपूरमधील एका प्रसिद्ध औषध कंपनीच्या नावाने कायमोरल फोर्ट नावाच्या बनावट गोळ्या बाजारात विकल्या गेल्या, आणि त्या पुरवठा साखळीचा शोध सुरू झाल्यावर याचे धागेदोरे थेट मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील विक्रेते आणि पुरवठादारांपर्यंत पोहोचले. सौंदर्य खुलविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही बनावट फेअरनेस क्रीम्समध्ये त्वचा आणि किडनीला हानी पोहोचविणारे घटक असल्याची बाबही प्रशासनाने आता उजेडात आणली आहे. पाकिस्तानात उत्पादन होणाऱ्या काही घातक सौंदर्य प्रसाधनांनी भारतातील बाजारपेठांत शिरकाव केल्याचेही स्पष्ट झाले.
आजकाल आपल्या गरजेच्या असंख्य वस्तू घरबसल्या मिळण्याची सोय अनेक शहरांत आणि आसपासच्या गावांतही उपलब्ध झाल्याने, मोबाईलवरील अँपद्वारे ऑर्डर करण्याची सवय वाढत चालली आहे. गेल्या महिन्यात अखेरच्या आठवड्यातील एके दिवशी मुंढे यांच्या आदेशावरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात सरवली येथे एक कारवाई केली, आणि ऑर्डर देऊन मागविलेले खाद्यपदार्थ किती धोकादायक ठरू शकतात, याचे विदारक वास्तवच स्पष्ट झाले. अमेझॉन रिटेल इंडिया नावाच्या प्रसिद्ध कंपनीच्या गोदामात या वास्तवाची पाळेमुळे रुजली होती, हे उघड झाले. ग्राहकांच्या आरोग्यास घातक ठरू शकतील असे, कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ नष्ट न करता त्यांची पुन्हा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली, आणि पथकाने या गोदामावर कारवाई सुरू केली. या धंद्यात कंपनीने आणखीही एका धंदेवाईकास हाताशी धरले होते, हेही स्पष्ट झाले. कालबाह्य आणि आरोग्यास अपायकारक अशा अन्नपदार्थांची विल्हेवाट लावल्याची प्रमाणपत्रेदेखील खोटी असल्याचे स्पष्ट झाले. अशी खोटी प्रमाणपत्रे सादर करून प्रत्यक्षात त्या पदार्थांची विल्हेवाट न लावता त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या घरपोच सेवेचा लाभ आजवर लाखो ग्राहकांना घेतला असेल, आणि पोटातून जाणाऱ्या या पदार्थांनी कदाचित त्यांची ह्रदयेदेखील जिंकली असतील. आता त्यामागील सत्य स्पष्ट झाले असून, मुदतबाह्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारूनच त्याची विल्हेवाट लावली जात असल्याचेही उघड झाले आहे. नागपूरच्या एका नामांकित इस्पितळात कायदेशीर परवानगी नसलेली लाखो रुपयांची औषधे विक्रीसाठी राखून ठेवली होती, आणि रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचे स्वातंत्र्य नाकारून, या यंत्रणेतून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात होती. ग्राहकाच्या व्यवहारांवर ताबा मिळविण्याचे या धंद्याचे तंत्रदेखील या कारवाईतून उघड झाले. अगदी अलीकडे, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे ग्राहकांची ह्रदये जिंकणाऱ्या मुंबईतील एक नामांकित आईस्क्रीम निर्मात्या कंपनीवरील कारवाईतून उघडकीस आलेले चित्र धक्कदायक आहे.adulteration या कंपनीच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जिवंत उंदरांचा सुळसुळाट, माश्यांचा स्वैर संचार, कोल्डचेनमध्ये बिघाड आणि मुदतबाह्य उत्पादने आढळून आली. नागपूरमध्ये एका मिठाई नव अन्नपदार्थ उत्पादकाच्या तपासणीत मेलेला उंदीर आढळला. या मृत उंदराच्या बाजूलाच अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे दिसून आले. ग्राहकांच्या आरोग्याशी असा खेळ करणाऱ्या धंद्यांवरील कारवायांमुळे आता महाराष्ट्र बचाव मोहिमेविषयी लोकांच्या अपेक्षांना आश्वस्ततेची जोड मिळू लागली आहे. अन्नपदार्थांत घातक पदार्थांची भेसळ होते, बनावट औषधे, सौंदर्य प्रसाधने आरोग्यास अपायकारक असतात, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कृत्रिमरीत्यादेखील तयार करता येतात, हे ग्राहकांच्या कानावर पडत होते. पण अशा धंद्यांवरील कारवायांचा वेग मात्र अनाकलनीयरीत्या कमी होता. आता जेमतेम चारदोन महिन्यांतील कारवायांनी अशा काळ्या धंद्याचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केल्याने, अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराचा जुना इतिहास विसरणेच योग्य ठरेल.
गेल्या आठदहा दिवसांत प्रशासनाच्या पथकांनी आपला मोर्चा दुधाकडे वळविला आहे. दूध न वापरणारे घर महाराष्ट्रात अपवादानेच आढळेल. देशात धवल क्रांतीचे पर्व सुरू झाले आणि दुधाचा महापूर आला. या महापुराचा तडाखा एवढा मोठा होता, की मागणीलाही प्रचंड पूर आला. दुधाचे उत्पादनही कमी ठरावे एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली, तरीही दुधाचा तुटवडा मात्र कधीच जाणवला नाही. उलट, मागणी पूर्ण करून दुधाची भुकटी तयार करण्याचा उद्योगही या क्षेत्राला सापडला, आणि दुधाच्या धंद्यातील अनेकांचे उखळ पांढरे झाले. दुधाचे प्रत्यक्ष उत्पादन, मागणी आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठ यांचे गणित कसे जुळते याचा हिशेब मात्र फारसा झालाच नसावा. अन्यथा, ग्राहकांच्या मागणीला पुरून उरणारे दूध येते तरी कोठून हा प्रश्न सतत समाजाला छळत राहिला असता. आता प्रशासनाच्या कारवायांममुळे या प्रश्नांची अनेक उत्तरे समोर येऊ लागली असून, उत्पादन, मागणी आणि पुरवठा यांतील तफावत भरून काढणारा कृत्रिम दुधाचा धंदा तेजीत असल्याचे उघड गुपित आता पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. राज्याच्या सात जिल्ह्यांत एकाच वेळी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने छापे टाकून ग्राहकांचा आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळीच्या भस्मासुराच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, ठाणे व अन्य दोन जिल्ह्यांतील कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला जवळपास तीन कोटींचा मुद्देमाल आणि हस्तगत करण्यात आलेले संशयास्पद नमुने तपाल्यानंतर, भेसळीचा काळा धंदा केवळ पाणी मिसळण्यापुरता मर्यादित नसून रसायने, डिटर्जंट. चरबी, युरिया, दूध भुकटी, शाम्पू, पामतेल, इमल्सिफायर आदी अनेक घातक वस्तूंपासून दूध तयार करून बनावटरीत्या बाजारात पुरविले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घातक वस्तू नैसर्गिक दुधात मिसळून किंवा या वस्तूंपासून दूध तयार करून ते पुरवठा साखळीत बेमालूमपणे आणणारे काळे धंदे महाराष्ट्रात वर्षानुवर्षे सुखाने सुरू आहेत, आणि संबंधित यंत्रणेस त्याची पुरेपूर जाणीवही आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत, अनेक श्रद्धाळू बाबांचा प्रसाद म्हणून तेथील पेढे विकत घेतात. गेल्या महिन्यात या पेढ्यांच्या बाजारपेठेतील भेसळीचा भस्मासुर प्रशासनाने पकडला. सुमारे सातशे किलो भेसळयुक्त पेढे बुलडोझरच्या साह्याने नष्ट करण्यात आले. ग्राहकांच्या जिवाशी असा भयानक खेळ खेळणारा या काळ्या धंद्याचा कोण संरक्षण देते, कोणाचे पाठबळ आहे, याची उत्तरे सापडणे मात्र, अवघडच आहे. अन्न व औषध प्रशासन आता गतिमान होत असून प्रशासनाकडे दाखल होत असलेल्या प्रत्येक तक्रारीवर योग्य ती कार्यवाही होत आहे, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत दिली. आता गतिमान होत असलेले प्रशासन याआधी सुस्त होते, याचीच ही अप्रत्यक्ष कबुली नव्हे का?
अन्न हे पूर्णब्रह्म आहे अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. अन्नाचे सेवन करणे हे केवळ पोट भरणे नव्हे, तर यज्ञकर्म आहे, असेही म्हटले जाते. बाळाच्या बाटलीतून पाजले जाणारे व पूर्णान्न मानले जाणारे दूध, खाल्ला जाणारा अन्नाचा प्रत्येक घास, आणि जीव वाचविणारी किंवा आरोग्यास पोषक ठरणारी औषधे विश्वासार्ह असलीच पाहिजेत. कारण, सुरक्षित आणि आश्वस्त जगणे हा जनतेचा पहिला हक्क असतो. त्या हक्काची जपणूक करणे ही अशा यंत्रणांची जबाबदारीच असते. त्यामुळेच, अन्न व औषध प्रशासनाने उघडलेल्या महाराष्ट्र बचाव मोहिमेचे कौतुक होणे सहाजिक असले, तरी ती या यंत्रणेची जबाबदारीच आहे, हेही स्पष्ट आहे. उलट, ही जबाबदारी या यंत्रणेने याआधी एवढ्या धडाकेबाजपणे का पार पाडली नाही, हा प्रश्न आता विचारला गेला पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाया केवळ प्रशासनाच्या जबाबदारीचा भाग नव्हे, तर जनतेच्या आरोग्यासमोर संकटे निपटण्याची मोहीम आहे. अशा मोहिमा म्हणजे जनतेच्या आरोग्याचा आधार असतात, मुलांच्या भविष्याची हमी असतात आणि समाजाच्या निकोप प्रगतीच्या पायऱ्या असतात. शुद्ध अन्न, गुणवत्तापूर्ण औषधे हा केवळ आरोग्याशी निगडीत मुद्दा नाही, तर व्यवसायाच्या सचोटीचा, म्हणजेच समाजाच्या संस्कृतीचाही आरसा असतो. भेसळखोरीमुळे समाजाला आरोग्यसंकटाच्या खाईत ढकलणाऱ्या प्रवृत्ती सहजपणे जेथे फोफावतात आणि त्यांचे धंदे सुखैनेव सुरू राहतात, अशा समाजाच्या संरक्षणासाठी संस्कृती असमर्थ ठरते. केवळ परंपरा, संस्कृती आणि संस्काराचे पाढे वाचून हा बदल घडणार नाही. मानसिकतेशी संबंधित असलेल्या या विकृती ठेचून टाकण्यासाठी कृतिशील होण्याची गरज आहे. अन्न व औषध प्रशासन गतिमान झाल्याने त्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. कोणत्याही दबावाचे किंवा सुस्तीचे निमित्त त्यामध्ये बाधा आणणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.