१५ राज्यांवर मुसळधार पावसाचे संकट

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
threat of heavy rainfall देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच भारतीय हवामान विभागाने शनिवारी (१२ जुलै) उत्तर भारतासह देशातील १५ राज्यांसाठी मुसळधार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये हवामानाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
threat of heavy rainfall
 
दिल्ली-एनसीआरमध्ये १२ ते १४ जुलैदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची आणि काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, राजधानीसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे तापमानात वाढ होऊन नागरिकांना उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, मेरठ, आग्रा, गोरखपूर आणि मिर्झापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत ताशी ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
बिहारमधील पटना, खगडिया, किशनगंज, पूर्णिया, मुझफ्फरपूर आणि दरभंगा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये १२ ते १४ जुलैदरम्यान डेहराडून, नैनीताल, चमोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू, शिमला आणि मनाली परिसरातही जोरदार पावसासह ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोलकात्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, अनुकूल वातावरणामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पूर्व बर्धमान, नदिया आणि बांकुडा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, बीरभूम, हुगळी, उत्तर २४ परगणा आणि हावडा जिल्ह्यांतील काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.