वर्धा,
pankaj-bhoyar : जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील सर्वच घटकांनी एक येऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
व्हिजन ३०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत नवोदय विद्यालय सेलूकाटे येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. अरुण लखानी, आ. राजेश बकाने, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, विभागीय वन अधिकारी सुहास बढेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही तर लागवड केलेल्या झाडांचे पुढे काय होते याचे नियमित मूल्यमापन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाल्याचे सांगितले जाते. मात्र, चार-पाच वर्षांनंतर ती झाडं प्रत्यक्षात दिसून यायला हवी. निसर्ग सेवा समितीने गेल्या २५ वर्षांत केलेले कार्य उल्लेखनीय असून वर्धा शहरात १० वर्षांच्या कालावधीत सुमारे १५ हजार कडुलिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
वृक्षलागवड हा केवळ वन विभागाचा कार्यक्रम नसून सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था आणि इतर सहकारी संघटनांनी देखील मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आ. लखानी यांनी अलिकडच्या काळात अतिवृष्टी, दुष्काळ यासारखे प्रश्न भेडसावत असून त्याचे मुळ कारण पर्यावरणीय बदल आहे. वृक्षारोपन कार्यक्रमात विद्यार्थी आणि युवकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. लोकसहभागाशिवाय पाणी बचत मोहीम यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे लोकांचा सहभाग घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आ. बकाने यांनी सामाजिक वनीकरण विभाग आणि कर्मचार्यांनी झाडांच्या संगोपनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या संदेशाला प्रतिसाद देत प्रत्येकाने आपल्या घराजवळ किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते चित्रकला व निबंध स्पर्धेतील विद्याथ्र्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.