चेंज रिपोर्ट सादर करेपर्यंत धोरणात्मक निर्णयांना स्थगिती

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
वि. सा. संघाला निवडणूक अहवाल सादर करण्याचे धर्मदाय उपायुक्तांचे आदेश

पराग मगर
नागपूर, 
Vidarbha Sahitya Sangh विदर्भ साहित्य संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर नव्या कार्यकारिणीने सूत्रे हाती घेतली असली, तरी निवडणूक प्रक्रियेवरील वाद अद्याप कायम आहे. धर्मदाय उपायुक्तांनी संघाच्या अध्यक्षांसह नव्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना नोटीस बजावत बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) तातडीने सादर करण्याचे तसेच निवडणुकीदरम्यान झालेल्या सर्व तक्रारी आणि मतदान प्रक्रियेचा सविस्तर अहवाल पीठासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
Vidarbha Sahitya Sangh
विदर्भ साहित्य संघाच्या काही आजीव सदस्यांनी धर्मदाय उपायुक्तांकडे निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली होती. प्रमोद भुसारी, रवींद्र फडणवीस, प्रसेनजित गायकवाड, विनोद देशमुख, राजेश राजोरे आणि महेश कोपुलवार हे तक्रारदार आहेत. तक्रारदारांचे वकील ॲड. गणेश अभ्यंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान धर्मदाय उपायुक्तांनी नव्या कार्यकारिणीकडून अद्याप बदल अहवाल सादर करण्यात न आल्याची नोंद घेतली. बदल अहवाल सादर न करताच कार्यालय स्थलांतरासारखा निर्णय कसा घेण्यात आला, असा मुद्दाही सुनावणीत उपस्थित करण्यात आला. त्यानंतर चेंज रिपोर्ट मंजूर होईपर्यंत कार्यकारिणीला कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपायुक्तांनी दिले.
याशिवाय निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी, मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट पेपरची संपूर्ण माहिती आणि मतदान प्रक्रियेचा तपशील पीठासमोर सादर करण्याचे आदेश वि. सा. संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्यासह कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना देण्यात आले आहेत.
प्रमुख निर्देश
- बदल अहवाल मंजूर होईपर्यंत संस्थेची मालमत्ता विक्री, पुनर्विकास, भाडेपट्टा (लीज) बदल किंवा अन्य कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.
- निवडणूक प्रक्रियेतील सर्व तक्रारींचा तपशील पीठासमोर सादर करावा.
- मतदानाचे बॅलेट पेपर मतदारांना कधी पाठविण्यात आले आणि ते संस्थेकडे कधी प्राप्त झाले, याचा सविस्तर अहवाल सादर करावा.
- मतदान झालेले बॅलेट पेपर कोणत्या प्रतिनिधींमार्फत संस्थेकडे जमा झाले, याची संपूर्ण माहिती सादर करावी.
स्थलांतराच्या चर्चेला वेग
दरम्यान, विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयाच्या स्थलांतराबाबतही हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कारागृहामागील परिसरातील एक जागा नव्या कार्यालयासाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. येत्या २६ जुलै रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.