मुंबई,
see heavyrainfall again भर पावसाळ्यात वरुणराजाने आकस्मिक रजा घेतल्याने राज्यात पुन्हा उकाडा वाढल्याचे चित्र आहे. जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्र—ासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनचा वेग अचानक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पाऊस थांबल्यामुळे राज्यातील अनेक भागांत तापमान पुन्हा वाढले असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या मध्यातच वातावरणात झालेल्या या बदलामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

उपग्रहातून मिळालेल्या ताज्या हवामान निरीक्षणानुसार देशाच्या सुमारे 70 ते 80 टक्के भागावरून मान्सूनचे ढग कमी झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी देशभर सक्रिय असलेला पाऊस आता अनेक राज्यांत मंदावला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे पश्चिम प्रशांत महासागरात तयार होत असलेल्या शक्तिशाली चक्रीवादळाचा मोठा प्रभाव आहे. हे चक्रीवादळ हिंदी महासागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांचा प्रवाह स्वतःकडे खेचत असल्याने भारताकडे येणाऱ्या मान्सूनची ताकद कमी झाली आहे. परिणामी, सध्या देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण घटले असून काही ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात एकूण पर्जन्यमान सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता असली तरी काही दिवस मान्सून कमकुवत राहू शकतो. पश्चिम आणि पूर्व भारतात काही प्रमाणात पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी मध्य भारतातील अनेक भाग अजूनही अपेक्षित पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील काही आठवड्यांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट—ाचा विचार केला तर कोकणातील मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तर सिंधुदुर्गात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट—ात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून घाट परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. पश्चिम महाराष्ट—ातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये वातावरण प्रामुख्याने कोरडे राहू शकते.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.