गायक पलाश मुच्छलला अटक होणार?

जुनी मैत्रीण स्मृती मंधानाच्या मित्राचे गंभीर आरोप

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
मुंबई,
palash muchhal क्रिकेटर स्मृती मंधानाची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे चर्चेत आलेला तिचा एक्स बॉयफ्रेंड गायक पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. सांगलीतील आर्थिक फसवणूक प्रकरणी ही कारवाई होऊ शकते. पलाश हा त्याच्या लग्न सोहळ्यापूर्वी चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने सांगलीत आला होता. तेव्हा स्मृती मंधानाचा बालमित्र आणि सांगलीतील चित्रपट निर्माता विज्ञान मानेशी ओळख झाली होती.
 
 
palash muchhal
 
पलाशने ’नजरिया’ या चित्रपटात गुंतवणुकीसाठी माने यांच्याकडून तब्बल 25 लाख रुपये घेतले होते. विज्ञान माने यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पलाशवर आहे. चित्रपट पूर्ण न केल्यामुळे पलाशने फसवणूक केल्याचा आरोप मानेंनी केला. तसंच पैशांची मागणी केल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली-आष्टा रोडवरील टोल नाक्यावर वाद झाला होता. त्यावेळी पलाशने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मानेंनी सांगली शहर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.
 
 
अ‍ॅट्रोॅसिटीच्या गुन्ह्यात अटकेच्या भीतीने पलाशने अटकपूर्व जामिनासाठी सांगलीतील जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्याला अंतरिम जामीन मिळाला होता. अंतिम सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी पलाशचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.