गोंदिया,
gondia-vadsa-memu-local : गोंदिया-वडसा मेमू लोकलमधून प्रवास करणार्या महिलेला धावत्या रेल्वेतून खाली धक्का देऊन तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रारंभीक ही घटना अपघाती असल्याची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली. मात्र, तपासादरम्यान, रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेचा उलगडा झाल्याने एकच खळबळ उडाली. रितू विनायक धमगाये (43) रा. गणखैरा, ता. गोरेगाव असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रितू या नेहमीप्रमाणे बुधवारी 8 जुलै रोजी सायंकाळी 7.05 ते 7.30 वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी क्रमांक 68806 गोंदिया-वडसा मेमू लोकलने कामावरून स्वगावी जात असताना ही घटना घडली. घटनेच्या दिवशी रितू यांना घरी परतण्यास उशीर झाल्याने त्यांचा भाऊ मंगेश विनायक धमगाये यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाही. दरम्यान, दुसर्या दिवशी 9 जुलै रोजी गणखैरा येथील रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पोल क्रमांक 1009/15 समोरील डव्वा गाव शिवारातील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली. तपासादरम्यान शुक्रवारी 10 जुलै रोजी रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. ज्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती रितू यांचा हात जबरदस्तीने पकडून धावत्या मेमू लोकलच्या डाव्या बाजूच्या दरवाजातून बाहेर ढकलत असल्याचे दिसून आले. या दृश्यामुळे सदर घटना अपघात नसून त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करून तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडे सोपविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने तपासाला सुरुवात करत सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे 11 जुलै रोजी आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, पुढील चौकशीसाठी आरोपीला गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. सदर आरोपी छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील रहिवासी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखातर्फे देण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.