नामांकन होताच उमेदवार अटकेत!

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
पाटणा,
candidate arrested बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या नामांकनाच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. जनशक्ती जनता दल (जेजेडी)च्या उमेदवार वीणा मानवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली. या कारवाईनंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोंधळ घातला, तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वीणा मानवी यांना ताब्यात घेतले.
 
candidate arrested
 
रविवारी पाटणा येथील बांकीपूर विधानसभा जागेसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. याचवेळी जन सूरजचे नेते प्रशांत किशोरही आपल्या समर्थकांसह नामांकन प्रक्रियेसाठी उपस्थित होते. दरम्यान, जनशक्ती जनता दलाच्या उमेदवार म्हणून वीणा मानवी यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, नामांकन प्रक्रिया पूर्ण होताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
 
या घटनेनंतर जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या कारवाईवर आक्षेप घेत, वीणा मानवी यांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. बांकीपूरमधील जनता सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
याआधी तेज प्रताप यादव यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती जनता दलाने आगामी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्त्या वीणा मानवी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले होते. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आणि बांकीपूरच्या नागरिकांचा आवाज बनण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले होते.