मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'सेफ्टीगिरी जिंदाबाद'चे लोकार्पण

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 'सेफ्टीगिरी जिंदाबाद' लघुपटाचे लोकार्पण 12 जुलै 2026 ला झाले. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या "सेफ्टीगिरी जिंदाबाद" या लघुपटाचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाच्या सामाजिक संदेशाचे कौतुक करत, रस्ते सुरक्षेसाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
 
mukh 
 
 
भारतामध्ये दररोज अनेक नागरिक रस्ते अपघातांमध्ये जीव गमावत आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणे, निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालना ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि युवा पिढीमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने "सेफ्टीगिरी जिंदाबाद" या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
 
या चित्रपटाची निर्मिती रोडमार्क फाऊंडेशनचे राजू वाघ आणि मनीष उपाध्ये यांच्या सहकार्याने "स्क्रॅच टू स्केल" या संस्थेने केली आहे. चित्रपटाचे लेखक हर्षद सालपे, दिग्दर्शक पियूष धूमकेकर आणि समर बोबडे असून, मार्केटिंग प्रमुख व अभिनेता विजय जथे तसेच अक्षय माहुरिया, यांनी या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
चित्रपटाला ललित कला विभाग रा.तू.म.ना.वि .च्या विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात आणि अरविंद पाटील ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
या कार्यक्रमाला DCP Traffic  आदित्य मिरखेलकर (IPS) यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी अशा आशयघन चित्रपटांची गरज अधोरेखित केली आणि समाजाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
 
यावेळी "सेफ्टीगिरी जिंदाबाद भाग २" लवकरच तयार करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानाचा भाग म्हणून हा लघुपट राज्यभरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. याशिवाय "स्क्रॅच टू स्केल" संस्थेने रस्ते सुरक्षा, लघुपटनिर्मिती आणि सामाजिक जनजागृती यांसंदर्भात विशेष प्रशिक्षण व अभ्यासक्रम सुरू करावेत, अशीही सूचना यावेळी करण्यात आली.
 
माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेल्या या लोकार्पणामुळे संपूर्ण चित्रपटाच्या टीममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा क्षण टीमसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी कला आणि माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने "सेफ्टीगिरी जिंदाबाद" हा लघुपट निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
 
सौजन्य:विजय जथे,संपर्क मित्र