बांगलादेशचे ‘रेड कार्ड’!

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
दिल्ली दिनांक...
रवींद्र दाणी
'Chinese Citizenship': "Red Card" अमेरिका- तेथे स्थायिक होणार्‍या विदेशी नागरिकांना ‘ग्रीन कार्ड’ जारी करते, युरोपियन युनियन तेथे काम करणार्‍या विदेशी नागरिकांना ‘ब्लू कार्ड’ जारी करते आणि चीन? आपल्या देशाचे मांडलिक होणार्‍या देशांना ‘रेड कार्ड’ जारी करतो. बांगलादेशने नुकतेच ‘चीनचे नागरिकत्व’ म्हणजे रेड कार्ड घेतले आहे.
 
 
rahaman-shizinping
भारताचे अपत्य : बांगलादेश म्हणजे भारताचे अपत्य. भारताने अतिशय दूरदर्शीपणा दाखवित ५५ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि पूर्व पाकिस्तानला बांगलादेश म्हणून मान्यता दिली. १९७१ च्या त्या घटनेपासून भारत-बांगलादेश संबंध ‘अतूट’ होते. आता हे संबंध पूर्णपणे संपुष्टात आले असून, बांगलादेशने चीनचे ‘पितृत्व’ मान्य केले आहे.
पहिला दौरा चीनचा : बांगलादेशचे युवा पंतप्रधान तारीकरहेमान यांचा पहिला परदेश दौरा चीनचा झाला आणि त्यांनी चीनसोबत अनेक करारांवर सह्या केल्या, त्या भारतासाठी अतिशय संकटाच्या ठरणार आहेत.
चीनचा हात : बांगलादेशात दीड-दोन वर्षांपूर्वी शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जो उठाव झाला, त्यामागे पाकिस्तान व चीन आहेत, असे म्हटले जात होते. यात चीनची भूमिका मुख्य व मोठी होती असेही मानले जात होते. त्यावर नंतरच्या घटनाक्रमाने शिक्कामोर्तब होत आहे.
‘रॉ’ गाफील : पाकिस्तान व चीन बांगलादेशात सत्ताबदलाचे कारस्थान आखत असताना, भारताच्या ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेला याचा जराही मागमूस लागू नये हे खरोखरीच दुर्दैवी होते. पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर बांगलादेशातून पलायन करण्याची वेळ आल्यानंतर, भारत सरकारला या गंभीर संकटाची कल्पना आली. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शेख हसीना यांना भारतात आश्रय देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला, जो अतिशय योग्य असाच होता. पण, बांगलादेशात सत्तापरिवर्तनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. चीनचे कारस्थान सफल झाले होते.
मांडलिकपंतप्रधान : बांगलादेशात प्रारंभी काही काळ मोहम्मद युनूस या अर्थशास्त्री असणार्‍या नेत्यास काळजीवाहू सरकारचे प्रमुख करण्यात आले. तेव्हापासूनच त्यांची पावले चीनच्या दिशेने पडू लागली होती. तेथे निवडणुकीनंतर तारीक रहेमान सत्तेवर आल्यानंतर चीनच्या दिशेने पडणार्‍या पावलांची गती वाढली व आता पहिल्या विदेश दौर्‍यासाठी चीनची निवड करून तारीक रहेमान यांनी चीनचे मांडलिकत्व स्वीकारण्याची प्रक्रिया एकप्रकारे पूर्ण केली.
‘पाकिस्तानी पॅटर्न’ : पाकिस्तानवर आपली पकड मजबूत करण्यासाठी चीनने तेथे चायना-पाकिस्तान एकॉनॉमिक कॉरिडोर म्हणजे ‘सीपीईसी’ या नावाचा एक प्रकल्प सुरू केला. त्यात चीनने ४५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रेल्वे मार्ग, रस्ते, वीज केंद्रे, विमानतळ आणि पाकिस्तानचे ग्वादर बंदर विकसित करण्याचा हा प्रकल्प राबवून चीनने पाकिस्तानला आपल्या पिंजर्‍यात बंद केले आहे. याशिवाय चीनने आपले लष्करी तंत्रज्ञान पाकिस्तानला देणे सुरू केले आहे.
 
आता बांगलादेशातही : चीनने आता बांगलादेशातही असाच प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारच्या प्रस्तावावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे कळते. चीनचे कनमिंग बंदर बांगलादेशच्या मोंगला बंदराशी जोडले जाणार आहे. म्हणजे पाकिस्तानच्या ग्वादर बंदराशी आपले शहर जोडून चीनने अरबी सागराचा मार्ग मोकळा केला तर आता बांगलादेशच्या माध्यमातून त्याने बंगालच्या उपसागरात जाण्याचा मार्ग तयार करण्याचे ठरविलेले दिसते.
भारताच्या सीमेलगत : भारत-बांगलादेश सीमेलगत लालमोईरहट नावाचा हवाईतळ आहे. १९४५ मध्ये संपलेल्या दुसर्‍या महायुद्धापासून तो बंद पडून आहे. त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव चीनने दिला असून, तो बांगलादेशने स्वीकारला आहे. भारतावर दबाव कायम ठेवण्यासाठी चीनने हा निर्णय घेतला असल्याचे मानले जाते. बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यापासून लगेचच चीनने या हवाई तळाचे नूतनीकरण करण्यास प्राधान्य दिले यावरून चीनसाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे याची कल्पना करता येईल.
तिष्ठा नदी प्रकल्प : बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहेमान यांच्या चीन दौर्‍यानंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन तर भारतासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. तिष्ठा नदीचे व्यवस्थापन, नवनिर्माण या सार्‍यासाठी चीन बांगलादेशला संपूर्ण सहकार्य देईल असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यात कोणत्याही ‘तिसर्‍या देशाने’ चिंतित होण्याचे कारण नाही. हा प्रकल्प तिसर्‍या देशाच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त असेल असेही चीन-बांगलादेश यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
‘पॉवर चायना’ : तिष्ठा नदी प्रकल्प राबविण्यासाठी चीनने आपल्या ‘पॉवर चायना’ या कंपनीची निवड केली आहे. पॉवर चायना ही सरकारी कंपनी असून, आशियातील अनेक देशांमध्ये आपले हात-पाय पसरण्यासाठी चीनने या कंपनीचा वापर केला आहे. पॉवर चायना कंपनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी- पीएलएचाच एक भाग असल्याचे मानले जाते. यावरून चीनच्या डोक्यात काय काय सुरू आहे याचा अंदाज बांधता येईल.
अतिशय चिंताजनक : तिष्ठा नदी भारत-बांगलादेश सीमेजवळून प्रवाहित होते. चीनने या नदीवर डोळा ठेवीत अनेकदा हसीना सरकारकडे नदीच्या विकासाचा प्रस्ताव दिला होता. पण भारताने वेळीच सावध होत, तो प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आता तेथे चीनचे समर्थक सरकार आले असल्याने चीनने तिष्ठा नदी विकास प्रकल्पाला हाती घेण्याचे ठरविले आहे. जे भारतासाठी गंभीर चिंता निर्माण करणारे ठरणार आहे. ही नदी भारताच्या सीमेलगत तर आहेच, शिवाय अतिशय संवेदनशील मानल्या जाणार्‍या ‘सिलीगुडी कॉरिडॉर’च्या अगदी जवळ आहे. भारत आणि पूर्वोत्तर भारत यांना जोडणार्‍या ‘सिलीगुडी कॉरिडॉर’वर चीनची पूर्वीपासून नजर आहे. चीनच्या दबावाखाली हसीना सरकारने तिष्ठा नदी प्रकल्पाच्या तांत्रिक सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती, पण भारताच्या जोरदार विरोधानंतर ती थंड्या बस्त्यात ठेवण्यात आली होती.
आणि पाकिस्तानही : बांगलादेश ज्या पाकिस्तानच्या अत्याचारास कंटाळून वेगळा झाला, विभक्त झाला, त्या पाकिस्तानसोबत त्याने पुन्हा ‘प्रेमालाप’ सुरू केला आहे. व्यापार-व्यवसाय वाढविण्याचे करार केले जात असताना, त्यात आता एका नव्या कराराची भर पडणार आहे. प्रथमच पाकिस्तान-बांगलादेश ‘जॉईंट मिलिटरी कमांड’- संयुक्त लष्करी आघाडी स्थापन करण्याबाबत विचार करीत असून, याबाबत दोन्ही देशांत होत असलेली चर्चा अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे.
लढाऊ विमाने : चीनच्या सहकार्याने पाकिस्तानमधील कराची एरोनॉटिक केंद्रात जेएफ-१७ थंडर या लढाऊ विमानांचे उत्पादन केले जात आहे. मागील वर्षी झालेल्या भारत-पाकिस्तान चकमकीत पाकिस्तानने याच विमानांचा वापर केला होता. पाकिस्तानने आता ही विमाने बांगलादेशला विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पहिल्या टप्प्यात १६ ते ४८ विमाने बांगलादेशला विकली जातील. या विमानांचे प्रशिक्षण बांगलादेशी वैमानिकांना देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.
चीनचा विळखा : चीन भारताला विळखा घालण्याचे धोरण राबविणार आहे, असे तज्ज्ञांनी यापूर्वीच म्हटले होते. आता ते प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तानसोबत चीनने यापूर्वीच घट्ट युती केली आहे. भूतान चीनला मांडलिक झालेला आहे. एक काळ होता भारतीय लष्कराची एक ब्रिगेड भूतानच्या रक्षणासाठी तेथे तैनात होती. आता भूतानही भारताच्या विरोधात गेला आहे. नेपाळला चीनने केव्हाच आपल्या विळख्यात घेतले आहे. श्रीलंकेवरही चीनचा प्रभाव वाढत आहे. मालदीवमध्ये तैनात भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या हटविण्यात चीन होता. तेथे चीनने आपल्या तुकड्या तैनात केल्या आहेत. फक्त बांगलादेश काय तो चीनच्या प्रभावापासून मुक्त होता. आणि दक्षिण आशियात भारताचा एकमेव विश्वासू साथीदार होता, मित्र होता. दुर्दैवाने त्याने भारताचा हात सोडून चीनचा हात धरला आहे. चीनचे ‘रेड कार्ड’ गळ्यात घालून बांगलादेश आता जगभर मिरविणार असे दिसते.