खान सरांची अटकेची टांगती 'तलवार' हटली

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
पाटणा,
coaching centre attack बिहारची राजधानी पाटणा येथील गाजलेल्या कोचिंग सेंटर हल्ला आणि गोळीबार प्रकरणात प्रसिद्ध शिक्षक फैसल खान उर्फ खान सर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून या प्रकरणातील त्यांच्या दोन्ही अंगरक्षकांनाही जामीन मिळाली आहे.
 
coaching centre attack
 
हे प्रकरण २ जूनच्या रात्री घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. पाटणा येथील खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर गोंधळ आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी खान सर यांनी प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांशी संबंधित काही व्यक्ती किंवा समाजकंटकांनी त्यांच्या संस्थेवर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर त्यांनी आपल्या या वक्तव्यावरून माघार घेतली.
 
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता ज्ञान बिंदू कोचिंग संस्थेचे व्यवस्थापन आणि काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान खान सर यांच्या दोन्ही अंगरक्षकांनी हवेत गोळीबार केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली होती. वापरण्यात आलेली शस्त्रे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. या घडामोडींनंतर खान सरांनाही आरोपी करण्यात आले होते, मात्र त्यांच्या अटकेवर यापूर्वी तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे.
 
या प्रकरणामुळे काही काळ मोठी चर्चा रंगली होती. दरम्यान, ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांचे भाऊ प्रिन्स यादव यांचे नेपाळमध्ये निधन झाल्याची घटना देखील चर्चेत आली होती. याआधीही खान सर चर्चेत आले होते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका कोचिंग संस्थेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने विविध कोचिंग संस्थांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी प्रयागराज विकास प्राधिकरणाने (PDA) खान ग्लोबल कोचिंगमध्ये काही त्रुटी आढळल्याने संबंधित तीन मजली इमारतीतील कोचिंग सेंटर सील केले होते.