सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व काडतूस जप्त

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
राजुरा, 
Country-made pistol and cartridge seized राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करीत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईत एकूण 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रामनगर सास्ती येथील कोलगाव मार्गावरील राममंदिर परिसरात करण्यात आली.
 
 
kata
 
रामनगर सास्ती येथील कोलगाव मार्गावरील राममंदिर परिसरात एक संशयित व्यक्ती शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव श्रीराज संग्राम बहुरिया (22, रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर) असे सांगितले. त्याच्या झडतीदरम्यान पँटमध्ये लपवून ठेवलेला एक गावठी देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या कट्ट्याची किंमत 10 हजार रुपये, तर काडतुसाची किंमत 500 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
 
 
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चांगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने केली.