वर्धा,
farmers-face-a-crisis : जिल्ह्यात आता पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांवर मोठे संकट ओढवले आहे. जुलै महिन्यात सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवत काळ्या आईच्या स्वाधीन आपले स्वप्न केली. पण ३ जुलैपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकर्यांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत. अंकुरलेले पीक कोमेजून माना टाकत आहे. काही ठिकाणी सोयाबीनहे बियानेच उगवले नसल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६३.०९ मिमी पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठच फिरवल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास पुढे काय असा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी, तूर व सोयाबीनची लागवड करतात. यंदाच्या वर्षी विविध कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी विभागाला आतापर्यंत सोयाबीन उगवले नसल्याच्या ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बियाणे उगवल्याने नसल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. याशिवाय बियाणे, खत आणि मशागतही करावी लागणार आहे.
जलाशयांत ५२ टक्के जलसाठा
जिल्ह्यातील ११ मोठे व मध्यम जलाशय आहेत. पण जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत जलाशयांच्या पाणी पातळीही पाहिजे तशी वाढ झाली नाही. जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशयांत सध्या ५२.२९ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा आहे. पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास पावसाळ्यातच पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सामान्य नागरिकांनाही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षी १ जून ते १३ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ३२३.०६ मिमी पाऊस झाला होता.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस
आर्वी : २८८ मिमी
कारंजा : २८१.०५ मिमी
आष्टी : ३१०.०८ मिमी
वर्धा : २२५.०४ मिमी
सेलू : १८८.०४ मिमी
देवळी : २३१.०५ मिमी
हिंगणघाट : १६१.०३ मिमी
समुद्रपूर : १९१.०१ मिमी
जलाशयांतील पाणी पातळी
जिल्ह्यातील बोर प्रकल्प : ५६.२८ टक्के, निम्न वर्धा : ६३.४२ टक्के, धाम प्रकल्प : ५०.०१ टक्के, पोथरा प्रकल्प : १८.५१ टक्के, पंचधारा प्रकल्प : २६.५१ टक्के, डोंगरगाव प्रकल्प : ३४.३७ टक्के, मदन प्रकल्प : ३०.४० टक्के, मदन उन्नई प्रकल्प : ०० टक्के, लाल नाला प्रकल्प : ३०.१५ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प : ५७.२६ टक्के, सुकळी लघु प्रकल्प : १६.१६ टक्के पाणी उपलब्ध आहे.