उमेश ताकसांडे
वर्धा,
gujarat khajur बी-बियाणे, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, निसर्गाचा लहरीपणा, विविध रोगांचा प्रादुर्भाव, अत्यल्प उत्पन्न त्यातच उत्पादीत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. अनेकांनी स्वत:ची शेती ठेक्याने देऊन स्वत: मजुरीला लागले आहे. मात्र, पवनार येथील ध्येयवेड्या युवा शेतकर्यांने पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिली. गुजरात येथून खजुरांची झाडे आणून यशस्वी प्रयोग साधला. चार वर्षानंतर आज त्याच्या हातात पहिल्यांदाच ४० हजाराचे उत्पन्न आले असून विविध फुल शेतीतूनही तो ‘लखपती’ होत आहे.
पवनार येथील भूषण वाटमोडे या युवा शेतकर्याची वडिलोपार्जीत वरुड शिवारात ८ एकर शेती आहे. भूषणने काही वेगळे प्रयोग सुरू केले. गुगलवरून नंबर शोधून इंग्लडच्या अतुल प्रायव्हेट लिमीटेड टिश्यू कल्चर कंपनीबद्दल माहिती घेतली. त्या कंपनीशी संपर्क साधून खजुराबाबत माहिती जाणून घेत गुजरात येथून जुलै २०२२ मध्ये १५ झाडं विकत आणली. झाडांची किंमत जास्त असल्याने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पाऊण एकर शेतात ३० बाय ३० मध्ये झाडांची लावण केली.
या झाडांना ठिबक सिंचनद्बारे पाणी व्यवस्थापन केले जाते. चार वर्षानंतर म्हणजे २०२५ मध्ये पहिली फळधारणा झाली. यात त्यांना अवघे ६० किलोच उत्पन्न झाले. मात्र, यावर्षी वाटमोडे यांना २०० किलो उत्पन्न झाले असून त्यांनी स्वत: स्टॉल लावून २०० रुपये प्रति किलोप्रमाणे ४० हजार रुपयांची कमाई केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार ५ वर्षानंतर प्रती झाड २५० ते ३०० किलो उत्पन्न देत असून पुढील वर्षी या १५ झाडांना जवळपास ४५०० किलो उत्पन्नातून लाखोंची कमाई होण्याची शक्यता शेतकरी भूषण वाटमोडे यांनी व्यक्त केली. यासोबत त्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी एस. बी. मुरार यांच्या मार्गदर्शनात एमआरईजीएसमधून शेतामध्ये निशीगंधा, झेंडू, गुलाब, शेवंती, अमेरिकन लिली, गेलार्डिया यासारख्या फुलांची लागवड केली असून यातूनही ते लाखो रुपयांची कमाई करीत आहे.
नुकतीच नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी वाटमोडे यांच्या नावीण्यपूर्ण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करीत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी सी. बी. चवणे, मंडळ कृषी अधिकारी एस. एस. मुडे, उप कृषी अधिकारी बी. यू. मुसळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी एस. बी. मुरार, शेतकरी अंबादास वाटमोडे, भूषण वाटमोडे, दिलीप जामनकर व परिसरातील शेतकर्यांची उपस्थिती होती.
...चौकट...
रोपं तयार करून झाडांची संख्या वाढवू : वाटमोडे
प्रयोग यशस्वी झाल्याने यावर्षीपासून आपण स्वत: रोपं तयार करून झाडांची संख्या वाढवू. खजूर पिकातून चांगले उत्पन्न येत असल्याने अन्य शेतकर्यांनीही आपल्या शेतात प्रयोग करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन भूषण वाटमोडे यांनी केले.