५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
तिवसा,
Gutkha seized in Tivsa अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवत तिवसा येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक उधळून लावली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेत तब्बल ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की, नागपूरकडून तिवसामार्गे ब्राऊन रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या एमएच-०१-सीव्ही-६२८२ क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याची वाहतूक हाेत आहे. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर–अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सुमित हॉटेलसमोर सापळा रचला. पहाटे संबंधित ट्रक येताच दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकची झडती घेतली असता 'बाजीराव' सुगंधित पानमसाला व 'मस्तानी' सुगंधित तंबाखू असे शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ भरलेले १३० मोठे नायलॉन पोते आढळून आले. या कारवाईत सुमारे ३९ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला १६ लाख रुपयांचा अशोक लेलँड ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, या अवैध गुटखा तस्करीमागील मुख्य सूत्रधार व पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार तसेच पोलिस अंमलदार रवींद्र बावणे, बळवंत दाभणे, भूषण पेठे, नीलेश डांगोरे, पंकज फाटे आणि चालक प्रशिक वानखडे यांच्या पथकाने केली.