बालोत्रा,
horrific accident राजस्थानातील बालोत्रा जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२५ वरील भंडियावास गावाजवळ भरधाव वेगाने धावणारी स्कॉर्पिओ पुढे जात असलेल्या डंपरवर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातानंतर तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस आणि १०८ रुग्णवाहिकेला माहिती दिली. मात्र रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने जखमी आणि मृतांना खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने बालोत्रा येथील शासकीय नाहटा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पाच गंभीर जखमींना जोधपूर येथे हलविण्यात आले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्या सर्व युवकांचा बयातू तालुक्यातील कानोड गावाशी संबंध आहे. मृतांची ओळख रेवंता राम (२६), स्वरूपराम (२७), भरत (२५), किशन (२७) आणि भावेश अशी झाली आहे. जखमींमध्ये अर्जुन राम यांचा मुलगा बाबू, मेहरा राम यांचा मुलगा मुकेश आणि जिया राम यांचा मुलगा हेमाराम यांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
प्राथमिक तपासात स्कॉर्पिओने प्रथम एका अज्ञात वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुढे असलेल्या डंपरवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, याच काळात राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड येथेही शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोलेरो कार अपघातग्रस्त झाली होती. त्या दुर्घटनेत १२ विद्यार्थी जखमी झाले होते.