टी-२०चा विसर, आता वनडेवर नजर!

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
लंडन,
india vs england भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला मोठा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर उर्वरित चार सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दुसऱ्या टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाचा पराभव झाला होता.
 
india vs england
 
आता भारताचे लक्ष एकदिवसीय मालिकेकडे लागले असून पहिला सामना १४ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना १६ जुलै रोजी होईल, तर तिसरा आणि अंतिम सामना १९ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील रविवारी या मालिकेचा निकाल लागणार आहे.
 
वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार असून श्रेयस अय्यर उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही संघात पुनरागमन झाले असून त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीमुळे भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.
 
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या संघात शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. टी-२० मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर वनडे मालिकेत विजय मिळवून पुनरागमन करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.