न्यूयॉर्क,
indian woman murdered in the us अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गुगलमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञान एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका भारतीय वंशाच्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिचा पतीनेच गोळ्या घालून तिला संपवलं आहे. शीतल व्रजेसियन असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या भयानक घटनेत त्यांच्या 23 वर्षीय मुलालाही गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती किर्क बी. व्रजेसियन (वय 56) याला अटलांटा जवळील कॉब काउंटी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जॉर्जियामधील स्मर्ना शहरात एका घरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री 8 वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरात प्रवेश केला असता पोलिसांना शीतल व्रजेसियन या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या अंगावर गोळ्या लागल्याच्या जखमा होत्या, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, त्यांचा 23 वर्षीय मुलगा जेसन व्रजेसियन हा घराच्या बाहेर जखमी अवस्थेत सापडला. त्यालाही गोळ्या लागल्या होत्या. आपत्कालीन पथकाने त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. आरोपी किर्क व्रजेसियन याला सध्या कॉब काउंटी अॅडल्ट डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. स्थानिक पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
कोण होत्या शीतल व्रजेसियन?
शीतल व्रजेसियन या तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि आदरणीय नाव होतं. त्यांना तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात 2 दशकांपेक्षा जास्त काळ काम करण्याचा दांडगा अनुभव होता. सध्या त्या गुगलमध्ये ’इंजिनिअरिंग लीडर’ म्हणून कार्यरत होत्या.