मुंबई
jethalal छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने गेल्या 15-16 वर्षांपासून प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असले, तरी जेठालाल हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. अभिनेते दिलीप जोशी अनेक वर्षांपासून ही भूमिका साकारत असून त्यांच्या अचूक विनोदी टायमिंग, प्रभावी हावभाव आणि वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीमुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, आता जेठालालच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात निर्माते मालिकेतील जेठालालचा ट्रॅक कमी करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एका नव्या राजस्थानी कुटुंबाची एंट्री झाली आहे. या कुटुंबात पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश असून अभिनेते कुलदीप गौर हे रतन सिंह बिंजोला ही भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री धरती भट्ट या त्यांच्या पत्नी रुपाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर वीर आणि बंसरी ही त्यांच्या मुलांची पात्रे आहेत. आता निर्माते या नव्या कुटुंबाभोवती कथानक अधिक केंद्रित करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, जेठालालची भूमिका jethalal साकारणारे दिलीप जोशी हे महिन्यातून सुमारे पंधरा दिवस शूटिंग करतात आणि मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. त्यामुळे निर्माते रतन सिंह बिंजोलाच्या कुटुंबाभोवती अधिक कथा गुंफण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या कुटुंबाच्या आगमनानंतर मालिकेतील बहुतांश कथानक त्यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून मालिकेत जेठालालचा ट्रॅकही फारसा दाखवण्यात आलेला नाही. त्याआधी काही काळ बाघा आणि बावरी यांच्या प्रेमकथेवर आधारित कथानक सुरू होते. त्या काळातही जेठालालची उपस्थिती मालिकेत तुलनेने कमीच होती.
दरम्यान, जेठालाल हे या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय पात्र असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत खरोखरच कोणताही विशेष निर्णय घेण्यात आला आहे का, याबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच, अभिनेते दिलीप जोशी यांनीदेखील या चर्चांवर कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे आगामी काळात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नेमके कोणते बदल पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.