‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का

पडताळणीनंतर ९२ लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
ladki bahin yojana राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेत आली आहे. या योजनेचा राज्यातील असंख्य महिला लाभ घेत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळातही या योजनेचा सरकारला मोठा राजकीय फायदा झाल्याचे मानले जात होते. मात्र आता याच योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, लाखो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
 

ladki bahin yojana update 92 lakh women removed from beneficiary list after verification 
सुरुवातीला सुमारे ८० लाख महिलांची ladki bahin yojana नावे कमी होण्याचा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर तब्बल ९२ लाखांपेक्षा अधिक महिलांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांचा पुढील हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.या कारवाईमध्ये अनेक जिल्ह्यांतील लाभार्थी महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. यामध्ये बीड जिल्ह्याचा आकडा सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. एकट्या बीड जिल्ह्यातील तब्बल २८ लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने काही महिलांची नावे वगळण्यात आली असल्यास त्यांच्या तक्रारींची दखल घेत चौकशी करण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यानंतर योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मात्र ज्या महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही, तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. याशिवाय योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या उत्पन्नाच्या निकषांचे पालन न करणाऱ्या महिलांचीही नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
पडताळणीत तब्बल १२ लाख महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. तसेच ४.५ लाखांहून अधिक महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या कारणांमुळे त्यांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पुरुषांनीही अर्ज केल्याचे तपासणीत समोर आले आहे. छाननी प्रक्रियेनंतर अपात्र अर्ज बाद करण्यात आले असून, लाभार्थी यादीत तब्बल १४ हजार पुरुषांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा अर्जांवरही कारवाई करण्यात आली आहे.